जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२२ । येथील जी.एच. रायसोनी बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात शिवमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती विद्यार्थ्यांनी उत्साहात शिवमहोत्सव साजरा केला.
व्यासपीठावर अध्यक्षस्थानी रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा.डॉ. प्रणव चरखा यांची उपस्थिती होती. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी व शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शंभू पाटील यांनी सांगितले की, सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेल्या थोर शिवाजी महाराजांचे विचार आचार हे संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी वंदनीय असून, त्यांनी कधीही भेदभाव केलेला नाही. त्यांच्या विचारांचा अंगीकार करून प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणणे ही काळाची गरज आहे. संचालिका डॉ. प्रीती अग्रवाल यांनी प्रास्ताविकेत शिवाजी महाराज हे पराक्रमी योद्धे होते, या पराक्रमाबरोबरच शिवाजी महाराज यांच्या काळात उद्योग, जलसंधारण, जलसंवर्धन, पर्यावरण, शब्दकोष आणि शिवकालीन तलाव यांची विशेष व्यवस्था होती. ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हा उपक्रम शिवाजी महाराजांनी आपल्या काळात राबवला, असे सांगितले. विवेक पाटील, शीतल तायडे या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले तर जनसंपर्क अधिकारी बापूसाहेब पाटील यांनी आभार मानले.