⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

हृदयविकाराचा तीव्र झटका : सोयगावच्या रूग्णावर आव्हानात्मक प्रायमरी लाईफ सेव्हींग एन्जीओप्लास्टी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२२ । शेतीकाम करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालविणार्‍या सोयगावच्या रूग्णाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. दि.२७ रोजी रात्री ११ वाजता अत्यवस्थ परिस्थीतीत रूग्णाला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. हृदयाशी संबंधित तपासण्या झाल्यानंतर अत्यंत आव्हानात्मक परिस्थीतीत मध्यरात्री 2.30 वा. हृदयरोग तज्ञ आणि त्यांच्या टीमने या रूग्णाची प्रायमरी लाईफ सेव्हींग एन्जीओप्लास्टी यशस्वीरित्या केली.

दिनेशसिंग हजारी (वय ४९) हे औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव येथील रहिवासी आहेत. मूळात शेती करणारे दिनेशसिंग हजारी यांना अंगमेहनतीमुळे कधीही कुठलाही त्रास झाला नव्हता. मात्र, रविवारी दि. २७ मार्च रोजी रात्री जेवण झाल्यानंतर दिनेशसिंग हजारी यांना छातीत दुखू लागले. थोडे अस्वस्थ वाटल्यानंतर त्यांनी स्थानिक डॉक्टरांशी संपर्क साधला. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक औषधोपचार केला. मात्र, तरी देखील जीव कासावीस होत असल्याने त्यांनी पुन्हा स्थानिक डॉक्टरांना तपासणीसाठी घरी बोलावुन घेतले. डॉक्टरांनी इसीजी आणि रक्तदाब तपासणी केली असता त्यांना तातडीने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. हजारी यांच्या कुटूंबियांनी त्यांना तात्काळ त्याच दिवशी रात्री ११ वाजता डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रात्रीबेरात्री एखाद्याला हृदय विकाराचा तीव्र झटका आल्यानंतर रुग्णाला काही वेळातच जर रुग्णालयात दाखल केले तर त्यावर उपचार करणे शक्य होते. सोयगाव येथील दिनेशसिंग ह्या रुग्णाला अशाच स्वरुपाचा हृदयविकाराचा झटका आला होता. दोन व्हेसल्स ब्लॉक असल्याने एंजिओप्लास्टी आव्हानात्मक होती पण टिमवर्क आणि रुग्णाची इछाशक्ती यामुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली असे मत डॉ. प्रदिप देवकाते यांनी व्यक्त केले.

ट्रिटमेंट फर्स्टची अनुभूती

‘सोयगावचे दिनेशसिंग हजारी यांना रात्री ११ वा. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रात्रीच्या परिस्थीतीतही रूग्णसेवेला प्राधान्य देत डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातील हृदयरोग तज्ञ डॉ. प्रदीप देवकाते, डॉ. वैभव पाटील आणि हृदयालयाच्या टिमने कुठल्याही पैशांची किंवा योजनेची वाट न बघता उपचाराला सुरूवात केली. त्यामुळे ‘ट्रिटमेंट फर्स्ट’ ची अनुभूती डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात आली.

एन्जीओग्राफीत आढळले हृदयातील ब्लॉकेज

दिनेशसिंग पाटील यांना जेव्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी अत्यंत अत्यवस्थ परिस्थीती होती. हृदयातील हृदयरोग तज्ञ डॉ. प्रदीप देवकाते यांनी रूग्णाची गंभीर परिस्थीती लक्षात घेता एन्जीओग्राफीची तपासणी केली. या तपासणीत दिनेशसिंग यांची एक व्हेसल १०० टक्के तर दुसरी ९० टक्के ब्लॉक असल्याचे निदान करण्यात आले. निदानानंतर हृदयरोग तज्ञ डॉ. देवकाते यांनी हजारी कुटूंबियांना माहिती देत एन्जीओप्लास्टी तातडीने करण्याचा सल्ला दिला. हजारी कुटूंबातील सदस्यांनीही तात्काळ त्यास अनुमती दिली. त्यानंतर डॉ. देवकाते यांनी अत्यंत जोखमीची आणि आव्हानात्मक असलेली एन्जीओप्लास्टी दोन स्टेंट टाकून यशस्वी केली. यावेळी हृदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील हे देखील शस्त्रक्रियेसाठी उपस्थित होते. शस्त्रक्रियेसाठी निवासी डॉ. सुशांत वागज, जैस जोश यांच्यासह हृदयालयाच्या टिमने सहकार्य केले.