साडेसात हजार उमेदवारांनी दिली आरोग्य विभागाची परीक्षा

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑक्टोबर २०२१ । सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे विविध रिक्त पदांसाठी रविवार दि.२४ रोजी जळगाव शहरासह परिसरातील ५१ केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यात १४ हजार ७७८ उमेदवारांपैकी ७ हजार ४३३ उमेदवारांनी परीक्षा दिली.

राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून विविध रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. दरम्यान या रिक्त पदांसाठी रविवार दि.२४ रोजी जळगाव शहरासह परिसरातील ५१ केंदांवर लेखी परीक्षा घेण्यात आली. जळगावातील केंद्रांवर १४ हजार ७७८ उमेदवार लेखी परीक्षा देणार होते. मात्र त्यापैकी केवळ ७ हजार ४३३ उमेदवारांनी परीक्षा दिली तर ७ हजार ३१५ उमेदवारांनी परीक्षेला दांडी मारली.

डिजिटल लॉक आणि जॅमर
परीक्षा केंद्रात काही गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेण्यात आली होती. सर्वच परीक्षा केंद्रांवर डिजिटल लाॅक व वर्गात जॅमर बसविण्यात आले होते. परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर मोबाइल, हेडफोन, ब्ल्यू ट्यूथ, बॅग नेण्यास बंदी करण्यात आली होती. प्रत्येक केंद्रावर उमेदवाराला प्रवेश देताना मास्क, सॅनिटायझर देण्यात आले तसेच प्रवेशापूर्वी त्यांचे तापमान, सॅच्युरेशन मोजण्यात आले. यात विद्यार्थ्याला जर ताप आढळून आला तर त्याच्यासाठी स्वतंत्र वर्गाची व्यवस्था करण्यात आली होती. पण एकाही उमेदवाराला ताप आढळून न आल्याने स्वतंत्र वर्गाची व्यवस्था करण्याची वेळ आली नाही. कोषागार भवन येथून डिजिटल लॉक असलेली प्रश्नपत्रिका पेटी प्रत्येक केंद्रावर दुपारी २.३० वाजता पोहाेचवण्यात आली व पेपर सुरू होण्याच्या पंधरा मिनिट आधी त्या उघडण्यात आल्या.

रिक्षा चालकांनी आकारले दुप्पट भाडे
आसोदा केंद्रावर २४० परीक्षार्थींची व्यवस्था करण्यात हाेती. मात्र, येथील लेंडीनाला पुलावर जलवाहिनी दुरुस्तीसाठी खोदलेल्या खड्यामुळे बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. याचा फायदा घेत रिक्षा चालकांनी उमेदवारांकडून दुप्पट भाडे आकारण्यात आले. परीक्षार्थींंनीही दुप्पट भाडे देऊन परीक्षा केंद्र गाठले. परीक्षेसाठी जिल्ह्यासह परजिल्ह्यातील हजाराे परीक्षार्थी शहरात आले होते. परीक्षा आटोपल्यानंतर नवीन बसस्थानकांत परीक्षार्थींची गर्दी झाली होती. त्यामुळे जळगाव आगार प्रशासनाला ५.३० ते ७.३० वाजेदरम्यान ११ अतिरिक्त बसेस सोडाव्या लागल्या.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज