खळबळजनक : रावेर पं.स.च्या कागदपत्रांची तळीरामांकडून रद्दीत विक्री

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२१ । रावेर येथे ग्रामीण भागाचे विकास केंद्र असलेल्या पंचायत समितीच्या विविध योजनांची माहिती असलेल्या, महत्वाच्या फाईल व इतर कागदपत्रे बेवारस स्थितीत पडून आहेत. यातील काही कागदपत्रे बाहेरील मद्यपींनी पंचायत समितीत अनधिकृतणे प्रवेश करीत रद्दीत विकल्याची महिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या कागदपत्रांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

येथील पंचायत समितीचे कामकाज पुर्वी बालविकास प्रकल्पाच्या जुन्या हॉलमध्ये सुरू होते. मात्र नवीन बांधलेल्या इमारतीत गेल्या काही महिन्यांपूर्वी पंचायत समितीचे स्थलांतर करण्यात आले आहे. मात्र जुन्या हॉलमध्ये पंचायत समितीच्या विविध कामांच्या महत्वाच्या फाईल तसेच कागदपत्रांची गठ्ठे जुन्या हॉलमध्ये बेवारस स्थितीत पडून आहेत. याकडे पंचायत समितीच्या प्रशासनाचे व गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. विविध विषयांची व योजनांची माहिती असलेली ही कागदपत्रे बाहेरील व्यक्तींनी या हॉलमध्ये अनधिकृतणे प्रवेश रद्दी म्हणून विकल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

त्यामुळे कागदपत्रांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
चौकशीची मागणी : मद्यपींनी नेमकी कोणती कागदपत्रे दारूच्या पैशांसाठी चोरून नेली याची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. जुन्या हॉलमध्ये असलेल्या कागदपत्रांमध्ये महत्त्वाचे दस्तऐवज आहेत. त्यामुळे गहाळ झालेल्या कागदपत्रांमुळे भविष्यात प्रशासनाची अडचण वाढण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज