जिल्ह्यात आज कलम १४४ लागू, जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ नोव्हेंबर २०२१ । जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरीता आज सोमवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१)(२)(३) लागू करण्यात आले आहेत. या काळात जिल्ह्यात धरणे, मोर्चे, आंदोलन यावर बंदी घालण्यात आली असून तसे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले आहे.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, पोलीस अधीक्षक जळगाव यांनी २१ रोजी पत्रान्वय कळविल्यानुसार विविध राजकीय, पक्ष/संघटना यांच्यातर्फे महाराष्ट्र राज्यामध्ये दिनांक २२ नोव्हेंबर रोजी अमरावती येथे दिनांक १२ नोव्हेंबर रोजी झालेल्या दंगलीची चौकशी तसेच रझा अकादमीवर बंदी घालण्यात यावी व इतर मागण्याकरीता धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. सदर धरणे आंदोलन दरम्यान विविध राजकीय पक्ष/संघटना यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचेकडून अंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून शासन, प्रशासनास अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जिल्हा घटकात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी. कोणत्याही छोट्याशा घटनेवरून दोन समाजामध्ये जातीय दंगली होऊ नयेत व शांतता अबाधित राहावी करिता दिनांक २२ रोजी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(2)(3) लागू करण्यात आले आहेत.

विविध राजकीय पक्ष संघटना यांच्यातर्फे दिनांक २२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या धरणे आंदोलनामुळे जळगाव जिल्ह्यात दोन समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था भंग होऊन समाजात द्वेष निर्माण होऊन दंगली सारखे गंभीर गुन्हे घडून सार्वजनिक मालमत्तेस धोका उत्पन्न होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही अशी पोलीस अधीक्षक जळगाव यांनी माझ्या निदर्शनात आणून दिले आहे आणि ज्याअर्थी अशा वातावरणात जळगाव जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था भंग होऊन दोन समाजात तेढ निर्माण होऊन जातीय दंगल होऊ नये व शांतता अबाधित राहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वय जळगाव जिल्हा हद्दीमध्ये मोर्चा धरणे आंदोलन यावर बंदी घालणे जरुरीचे आहे अशी माझी खात्री झाली आहे, असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी म्हटले आहे.

आदेशानुसार आज कुणालाही मोर्चा, आंदोलन काढता येणार नसून तसे केल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाणार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज