पैसे पडल्याचे सांगत मोबाईलसह १५ हजारांची रोकड लांबवली

जळगाव लाईव्ह न्यूज | २४ ऑक्टोबर २०२१ । दवाखान्याच्या कामानिमित्त भुसावळात आलेल्या दाम्पत्याला कारच्या बाहेर पैसे पडले असल्याचे सांगून कारमधील १५ हजार रुपये व मोबाईल लंपास करण्यात आल्याची घटना भुसावळ शहरात रविवारी घडली. याप्रकरणी दोघा अज्ञात भामट्यांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

विजय शिवराम बडगुजर (वय-६१, रा. बोदवड) हे रविवार दि.२४ रोजी त्यांची पत्नी व चालकासह कार (क्रमांक एम.एच.२०, ए.वाय.२३४६) ने भुसावळातील जामनेर रोडवरील एका दवाखान्यात कामानिमित्त आले होते. दवाखाना सुरू होण्यास दिड तासांचा अवधी असल्याने विजय बडगुजर हे चालकासह पत्नीसाठी फळे आणण्यासाठी कारमधून बाहेर पडले. पत्नी पुष्पा बडगुजर या कारमध्ये बसून होत्या. याचवेळी दोन अज्ञात भामट्यांनी त्यांना वाहनाबाहेर पैसे पडले असल्याचे सांगितले. पुष्पा बडगुजर ह्या ते पाहण्यासाठी कारमधून खाली उतरताच दुसर्‍या भामट्याने कारमधील १५ हजार रुपये रोख व पाच हजार रुपये किंमतीचा मोबाईल लंपास केला. बडगुजर यांना काही कळण्याच्या आत भामटे पसार झाले.

पोलिसात गुन्हा दाखल
घटनेनंतर विजय बडगुजर यांनी बाजारपेठ पोलिसात धाव घेत घटनेची माहिती दिली. याप्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारावर चोरट्यांचा शोध सुरू केला असून तपास पोलीस नाईक शशीकांत तायडे करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज