‘त्या’ रेशन दुकानदारांच्या पाठीशी महापौरांसह सरपंच आणि नगरसेवक

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२१ । जिल्ह्यातील १२३ रेशन दुकानदारांनी धान्य वाटपात गैरव्यवहार केल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी उघड केले होते. जिल्हा प्रशासनाने नोटीस देत कार्यवाहीचा बडगा उचलताच त्या स्वस्त धान्य दुकानदारांना वाचवण्यासाठी शहराच्या महापौर जयश्री महाजन यांच्यासह तब्बल २२ नगरसेवक आणि तालुक्यातील सहा गावांचे सरपंच, उपसरपंच पुढे आले आहेत. विशेष म्हणजे पुरवठा दक्षता समितीच्या सदस्य असलेल्या नगरसेविका रेश्मा काळे यांचाही यात समावेश आहे. या लोकप्रतिनिधींनी संबंधित दुकानांतून कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होत नसल्याचे प्रमाणपत्रच लेखी स्वरुपात आपल्या सही आणि शिक्यानिशी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवले आहे.

जळगाव तालुक्यातील १२३ परवानाधारक स्वस्त धान्य दुकानदारांनी नोव्हेंबर महिन्याचे धान्य गोदामातून न उचलताच त्या महिन्याचे प्रधानमंत्री मोफत धान्य योजनेचे धान्य वाटप झाल्याचे दाखवले आहे. या संदर्भात तक्रार झाल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार संबंधित चौकशी अधिकाऱ्यांनी १४३ दुकानांचे रेकाॅर्ड तपासले आणि लाभार्थींपैकी काहींचे जबाबही नोंदवले. या चौकशीत नगरसेवक नवनाथ दारकुंडे, पत्रकार हेमंत काळुंखे यांची पत्नी यांच्यासह बहुतांश परवानाधारकांच्या दुकानातून लाभार्थ्यांचे अंगठे घेऊन धान्य वाटप केलेले नसल्याचे समोर आले आहे. त्याचा अहवाल संबंधित अधिकाऱ्यांनी पुरवठा अधिकाऱ्यांना सादरही केला आहे. या प्रकरणात एकूण ४७ परवानाधारक दुकानदारांना शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणीसाठी बोलावण्यात आले होते.

लोकप्रतिनिधींच्या पत्राची शक्कल

आपल्यावर होणारी कारवाई टाळण्यासाठी रेशन दुकानदारांनी नवीन शक्कल लढवली. आपल्या प्रभागात नागरिकांची कोणतीही तक्रार आली नसल्याचे स्थानिक लोकप्रतिनिधींची पत्रे घेतलेली आहे. बहुतांश सर्व लोकप्रतिनिधींनि नऊ डिसेंबर रोजी प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र बहाल केले आहे. या सर्वच प्रमाणपत्रांचा मसुदा जवळपास सारखाच आहे. त्यात नगरसेवकांनी आपल्या वाॅर्डातील सर्वच स्वस्तधान्य दुकानदारांना प्रामाणिकपणाचे हे प्रमाणपत्र बहाल केले आहे. बहुतांश नगरसेवक आणि सरपंचांच्या पत्रावर तर तारखेचाही उल्लेख केलेला नाही. या दुकानदारांच्या लाभार्थ्यांपैकी कोणाचीही काहीही तक्रार नाही, असेही या लोकप्रतिनिधींनी आपल्या लेटरहेडवर दिलेल्या या पत्रात नमूद केले आहे.

‘हे’ आहेत पत्र देणारे जळगावातील लोकप्रतिनिधी  

ही प्रमाणपत्रे सही आणि शिक्क्यानिशी स्वत:च्या किंवा ग्रामपंचायतीच्या लेटरहेडवर देणाऱ्यांमध्ये रिधुर गावचे उपसरपंच, वसंतवाडी गावच्या सरपंच वत्सला आधार पाटील, चिंचोलीचे सरपंच आणि उपसरपंच, भोलाणे गावच्या सरपंच विमलबाई कोळी, सुभाषवाडीचे सरपंच राजाराम चव्हाण, आसोद्याच्या सरपंच अनिता कोळी यांचा समावेश आहे. महापौर जयश्री महाजन, त्यांचे पती सुनील महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी उपमहापौर डाॅ.अश्विन सोनवणे, भाजपचे गटनेता भगत बालाणी, स्थायी समितीच्या माजी सभापती नगरसेविका ज्योती चव्हाण, मनोज आहुजा, प्रतिभा पाटील,गायत्री शिंदे, शोभाताई बारी, हसीना बी शरीफ शेख, प्रतिभा देशमुख, सुरेश सोनवणे, सयिदा शेख युसुफ, ज्योती शरद तायडे, दिलीप पोकळे, किशोर बाविसकर, रुकसाना खान, सुरेखा सोनवणे, उषाबाई पाटील, पार्वताबाई भील, कांचन सोनवणे, चेतन सनकत या नगरसेवकांचा समावेश आहे. याशिवाय शिवसेनेचे महानगरप्रमुख शरद तायडे यांनीही असेच प्रमाणपत्र दिले असून त्यातही ‘आमच्या वाॅर्डातील सर्व स्वस्त धान्य दुकान‘ असा उल्लेख आहे. ते आता नगरसेवक नाहीत. दरम्यान, बालाणी यांनी पत्र दिल्याचे खंडन केले आहे तर महापौरांनी पत्र केवळ डिसेंबर महिन्यासाठीच दिले असल्याचे सांगितले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -