शरद पवार शेतकऱ्यांचे नव्हे उद्योजक, साखरसम्राटांचे नेते : जळगावात सदाभाऊ खोतांचे टीकास्त्र

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२१ ।  रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार सदाभाऊ खोत यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. पवार हे जाणता राजा नसून ​ते शेतकऱ्यांचे नेते नाहीत, तर ते उद्योजकांचे व साखर सम्राटांचे नेते आहेत, असे वक्तव्य खोत यांनी केले आहे. पंचायत राज समितीच्या दौऱ्याच्या निमित्ताने सदाभाऊ खोत दोन दिवसांपासून जिल्ह्यात आले आहेत.त्यांनी मंगळवारी रात्री भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील उपस्थित होत्या. केंद्र सरकारने पारित केलेले तीन नवीन कृषी कायदे, उसाची एफआरपी, आरोग्य विभागाचा कारभार अशा विविध विषयांवर त्यांनी मते मांडत राज्य सरकारला लक्ष्य केले.

सदाभाऊ खोत पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या विधानसभा आणि विधानपरिषदेत २००५ मध्ये करार शेतीचे एक विधेयक आले होते. हे विधेयक म्हणजेच आज केंद्राने पारित केलेले तीन नवीन कृषी कायदे आहेत. गेली अनेक वर्ष या तीनही कृषी कायद्यांचा खरा फायदा कुणी घेतला असेल तर तो शरद पवारांच्या बारामती ऍग्रो कंपनीने घेतला आहे. स्वत: कायद्यांचा लाभ घ्यायचा. मात्र, आता फायदा घेण्याची शेतकऱ्यांची वेळ आल्यावर माझ्या कुटुंबाशिवाय कुणालाही लाभ मिळू नये, अशी दुटप्पी भूमिका पवार घेत असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला. कृषी कायद्यांच्या विरोधात काल भारत बंद पुकारण्यात आला होता. परंतु, या बंदमध्ये शेतकरी कुठेही दिसला नाही. जनतेने या बंदकडे पाठ फिरवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे तयार करून सत्तर वर्षांच्या गुलामगिरीतून शेतकऱ्यांना मुक्त करण्याचा आशावाद निर्माण केल्याचेही खोत म्हणाले.

शरद पवारांनी कधीही शेतकऱ्यांची बाजू घेतली नाही. म्हणून मी त्यांना कधीही जाणता राजा म्हणत नाही. ते त्यांच्या आत्मचरित्रात म्हटल्याप्रमाणे वागत नाहीत. शेतकऱ्याचा खजिना लुटण्यात ते माहीर आहेत. म्हणूनच त्यांनी राज्य सरकारच्या वतीने उसाच्या एफआरपीचे तीन तुकडे करण्यास केंद्राला सांगितल्याचा आरोपही खोत यांनी यावेळी केला. शेतकऱ्याने कारखान्यात उस देताच चौदा दिवसात एफआरपीचा भाग दिला पाहिजे. परंतु शेतकऱ्यांचा खजिना लुटण्यात माहिर असलेल्या शरद पवारांनी टप्प्या टप्प्याने रक्कम देण्याचा विचार मांडला. शरद पवारांची ही चाल लक्षात आली असून एफआरपी ही एकरकमी मिळावी ही भुमीका असून पवारांचा डाव हाणून पाडणार असल्याचे ‌सदाभाऊ खोत यांनी सांगीतले. यासाठी साखर आयुक्तांच्या कार्यालयासमाेर निदर्शने करणार असल्याचे तसेच हा मुद्दा केंद्राकडे मांडणार असल्याचे सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज