एस.टी. कर्मचारी पुन्हा संपावर

जळगाव लाईव्ह न्यूज । 8 नोव्हेंबर २०२१ । गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून संप पुकारण्यात आला होता, दरम्यान राज्य शासनाकडून काही मागण्या मान्य करण्यात आल्याने हा संप मागे घेण्यात आला होता. संप मागे घेऊन काही दिवस उलटत नाही तोच रविवार दि.७ पासून पुन्हा एस.टी. कर्मचाऱ्यांकडून संप पुकारण्यात आला आहे. यामुळे एसटीच्या ५०० वर फेऱ्या रद्द होऊन ५० लाखांचे नुकसान झाले आहे.

ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, कर्मचाऱ्यांना २८ टक्के महागाई भत्ता लागू करावा, वार्षिक वेतनवाढ २ वरून ३ टक्के मान्य केलेल्या तारखेपासून लागू करावी, सातव्या वेतन आयोगानुसार केंद्र व राज्य शासनाने लागू केलेला घरभाडे भत्ता सुधारित दराने लागू करावा, ठरलेल्या तारखेला वेतन मिळावे, थकबाकीची रक्कम एकरकमी मिळावी आदी मागण्यांसाठी एस.टी. कर्मचाऱ्यांकडून आंदोलन पुकारण्यात आले होते. दरम्यान, राज्य शासनाने २८ टक्के महागाई व वाढीव घरभत्ता देण्याचे मान्य केल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांकडून आंदोलन मागे घेण्यात आले होते. हे आंदोलन मागे घेऊन काही दिवस उलटत नाही तोच पुन्हा कर्मचाऱ्यांनी ‘एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे’, या मागणीसाठी रविवार दि.७ रोजी दुपारपासून संप पुकारला आहे.

५० लाखांवर नुकसान
जळगाव विभागातील जवळजवळ सर्वच आगारात संप पुकारण्यात आला आहे. रविवारी दुपारी चार वाजेपर्यंत १३२ तर रात्री उशिरापर्यंत ५०० फेऱ्या रद्द होऊन एसटीचे ५० लाखांचे नुकसान झाल्याचे समजते. दरम्यान, निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला आहे.

प्रवाशांचे हाल
रविवार दि.७ रोजी जळगाव विभागातील एस.टी. कर्मचाऱ्यांनी पुन्हा संप पुकारल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. वृद्ध, दिव्यांग, लहान मुले, महिलांचे चांगलेच हाल झाले. संपामुळे दिवाळीसाठी मुंबई, पुणे, नाशिक व अन्य काही भागांतून जळगाव जिल्ह्यात आलेल्या प्रवाशांना परतीच्या मार्गासाठी खासगी ट्रॅव्हल्सकडे धाव घ्यावी लागली. मात्र, ऐनवेळी गर्दी वाढल्याने काही ट्रॅव्हल्स चालकांनी भाडेवाढ केल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज