एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपात कुटुंबीयांनीही घेतला सहभाग

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२१ । राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून आठवडाभरापासून संप पुकारण्यात आला आहे. या संपात एरंडोल आगारातील २८५ कर्मचारी सहभागी झाले असून ते अजूनही आपल्या संपावर ठाम आहेत. शनिवार दि.१३ रोजी या संपकरी कर्मचाऱ्यांच्या आई-वडिलांसह कुटुंबीयांनी संपात सहभागी होत पाठिंबा जाहीर केला.

एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एरंडोल आगारातील कर्मचाऱ्यांनी आठवडाभरापासून संप पुकारला आहे. दरम्यान, या संपात शनिवार दि.१३ रोजी संपकरी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी सहभागी होत पाठिंबा दिला. यावेळी संपकरी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी आपले मनोगत व्यक्त केले. निलंबन झालेल्या कर्मचाऱ्यांसोबत आमचे देखील निलंबन करावे, असा ठराव देखील यावेळी करण्यात आला. यापुढे एरंडोल बस आगारात कुठलीही संघटना अस्तित्वात राहणार नसून ‘पावती व संघटना मुक्त एरंडोल आगार’ ठेवण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांकडून घेण्यात आला.

अभाविपचा पाठिंबा
एरंडोल आगारात व्यवस्थापकासह अन्य दोन कर्मचारी संपकाळात कामावर आहेत. आगारातील एकही कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई झालेली नाही. तसेच चोपडासारखा संपकरी कर्मचाऱ्यांचा मंडप आगाराबाहेर नेण्याचा प्रसंग याठिकाणी उद्भवलेला नाही. शांततेच्या मार्गाने संप सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान, एस.टी. कर्मचाऱ्यांच्या या संपाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून पाठिंबा देण्यात आला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज