उमलण्याआधीच सडताय कापसाची बोंडे; शेतकरी हवालदिल

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२१ । मुक्ताईनगर तालुक्यात होत असलेल्या सततच्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे कापसाच्या पिकावरील परीपक्व झालेल्या कैऱ्या उमलण्याआधीच सडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा हिरावला जाणार आहे.

यावर्षी मान्सुन लांबल्यामुळे तसेच परतीच्या पावसामुळे सततचा ओलावा, पिकांच्या मुळाशी वारंवार पाणी साचल्याने व पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत नसल्यामुळे कपाशी या पिकावर मर रोग, बुरशीजन्य आजार व बोंडसड होत आहे. परिणामी कपाशीच्या पिकांना परिपक्व झालेली फळे उमलण्याच्या आत खराब होऊन झाडांवरच सडत आहे. परिणामी शेतकऱ्यांना यावर्षी उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट सोसावी लागणार आहे. कपाशीच्या एकेका झाडावरील जवळपास पन्नास ते साठ दरम्यान बोंडे खराब होऊन उमलण्याआधीच कोमजेलेली आहे.

तालुक्यात सुमारे बावीस हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झालेली असुन अंदाजे दोन हजार शेतकऱ्यांनी विमा उतरविला आहे. मात्र बुरशीजन्य व बोंडसड आजार निकषात बसणार नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. परंतु उंबरठा उत्पादन सरसकट कमी आल्यास विमा कंपनीकडुन भरपाई मिळण्याची शक्यता असल्याचे तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी यांनी “जळगाव लाईव्ह न्यूजच्या” प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले. दरम्यान कापुस उत्पादक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनातर्फे मदत मिळावी अशी अपेक्षा होत आहे.

शासनाने योग्य मदत करावी
कपाशीच्या प्रत्येकी झाडावर पन्नास-साठ बोंडे सडली आहेत. यामुळे अपेक्षित उत्पादन मिळणे दुरापस्त आहे. नुकसान शब्दात सांगण्यासारखे नसुन शासनाने यावर्षी योग्य मदत करावी जेणेकरुन डबघाईस आलेला शेतकरी सावरेल.
– रविंद्र सांगळकर, शेतकरी

… तर भरपाई मिळणे शक्य
सततचा ओलावा तसेच पाण्याचा निचरा न झाल्याने मर रोगासह बुरशीजन्य व बोंडसड होत आहे. उंबरठा उत्पादनात घट झाल्यास विमा कंपनीकडुन भरपाई मिळणे शक्य आहे.”
– अभिनव माळी,ता.कृषी अधिकारी मुक्ताईनगर

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज