टाकरखेड्यात पुन्हा दरोडा, ३१ शेळ्या लंपास

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२१ । अमळनेर तालुक्यात शेळया चोरीचे सत्र सुरूच असून टाकरखेडा येथील शेडवर अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून शेडमधील ३१ शेळ्या चोरून नेल्याची घटना १८ रोजी रात्री घडली. याबाबत अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शेळया चोरीच्या या घटनांमुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गांधली येथे दरोडा टाकून अज्ञात चोरट्यांनी ६३ शेळ्या चोरून नेल्याची घटना रविवार दि.१७ रोजी घडली होती. ही घटना ताजी असतांना टाकरखेडा येथे पुन्हा दरोडा टाकून शेळया लंपास करण्यात आल्याची घटना घडली आहे. टाकरखेडा येथील ज्ञानेश्वर नगराज पाटील यांनी शेत गट नंबर ५/१ मध्ये शेळीपालन व्यवसाय सुरू केला आहे. अज्ञात चोरट्यांनी १८ रोजी रात्री शेतातील शेडचे कुलूप तोडून, ६६ हजार रुपयांच्या २२ बकऱ्या व ७ हजार रुपयांची पिले असा एकूण ७३ हजार रुपयांच्या शेळ्या चोरून नेल्या. १९ रोजी सकाळी रखवालदार मोती पावरा याने मालकाला ही घटना कळवली. शोधाशोध करत असताना शेडपासून अर्धा किमी अंतरावर दोन पिले आढळली. मात्र उर्वरित शेळ्या सापडल्या नाहीत. दरम्यान, याप्रकरणी अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पशुपालकांमध्ये भीती
अमळनेर तालुक्यातील गांधली येथील जालंदरनाथ चौधरी यांच्या जळोद रस्त्यावरील शेडमधून तोंडाला रुमाल बांधून आलेल्या आठ ते दहा जणांच्या टोळीने रविवार दि.१७ रोजी मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास दरोडा टाकून २ लाख ६३ हजार रुपये किमतीच्या ६३ बकऱ्या चोरून नेल्या होत्या. त्यानंतर टाकरखेडा येथे टाकण्यात आलेल्या दरोड्यामुळे पशु पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून या चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी पशुपालकांकडून होत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज