एनएसएस, एनसीसीसारख्या उपक्रमातूनच जबाबदार नागरिक घडतात : पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२१ । महाविद्यालयीन जीवनात राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना आणि स्काऊट अशा उपक्रमांमधून जबाबदार नागरिक घडविण्याची प्रक्रिया केली जाते. यातूनच राष्ट्र निर्माण होत असेत असे प्रतिपादन, जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि रासेयोचे विभागीय संचालनालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१२ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या पश्चिम विभागीय राष्ट्रीय सेवा योजना पूर्व प्रजासत्ताक दिन पथसंचलन निवड शिब‍िराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.बी.व्ही.पवार होते. यावेळी पुणे विभागाचे रासेयो संचालक डी. कार्तिकेयन, हैदराबाद येथील विभागीय संचालक एम.रामकृष्णन, पंतप्रधान कार्यालयाचे वित्त अधिकारी सिदार्थ चौहाण, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, प्राचार्य एल.पी.देशमुख, अधिसभा सदस्य दिनेश नाईक, अहमदनगर प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. शरद बोरूडे, युवा अधिकारी अजय शिंदे आदी उपस्थित होते. या शिबिरात महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगना, गुजरात, दमन, दादरा-नगरहवेली, गोवा या सात राज्यांमधील १०० विद्यार्थी व १०० विद्यार्थ्यांनी असे २०० विद्यार्थी सहभागी झाले होते. यातून ४० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. गुरूवार दि.२१ रोजी या शिबिराचा समारोप झाला.

पुढे बोलतांना डॉ. प्रवीण मुंडे म्हणाले की, एकात्मता, ऐक्य, राष्ट्रीय सुसंवाद, शारीरिक सुदृढता, सेवाभाव वृत्ती यामुळे राष्ट्र तयार होत असते. अशा शिबिरांमधून या प्रक्रियेला गती मिळते आणि जबाबदार नागरिक घडतो. विद्यार्थ्यांनी कायम खिलाडू वृत्ती अंगी बाळगावी असे आवाहनही त्यांनी केले. अध्यक्षीय भाषणात प्रा.बी.व्ही.पवार यांनी या शिबिराचा विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व घडविण्यात हातभार लागला, असे मत व्यक्त करून सात राज्यांच्या सहभागामुळे एकात्मतेचे दर्शन घडले असे प्रतिपादन केले.

प्रारंभी रासेयोचे संचालक व समन्वयक डॉ.पंकजकुमार नन्नवरे यांनी शिबिराचा आढावा घेतला. डी.कार्तिकेयन व अजय शिंदे यांनी ही मनोगत व्यक्त केले. सहभागी श्रीमती नईम बानो, सना शेख, राजश्री मकवाना, विवेक गोयल, जीवनकुमार, मनोज खन्ना, श्रीमती रोझा, महम्मद अफरिन, कुमारी इलिस यांनी शिबिराबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. दिनेश पाटील यांनी केले तर आभार प्रा.दीपक सोनवणे यांनी मानले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज