fbpx

देशी दारूच्या दुकानांवरील ‘सरकार मान्य’ शब्द काढून टाका : नितीन विसपुते

 

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२१ । शनिवारी देशभर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५२ वी जयंती साजरी होत आहे. गांधीजींनी आयुष्यभर व्यसनमुक्त समाजाच्या निर्माणासाठी प्रयत्न केले होते. केवळ ब्रिटिशांना बाहेर घालविणे एवढेच त्यांचे ध्येय नव्हते तर एकात्म, स्वावलंबी, उद्योग समाजनिर्मितीसोबतच दारिद्र्य आणि दैन्य निर्माण करणाऱ्या व्यसनाधीनता समूळ नष्ट व्हावी असे त्यांचे स्वप्न होते. त्याच गांधींजींच्या देशात आणि कर्मभूमी राहिलेल्या महाराष्ट्रात प्रत्येक देशी दारूच्या दुकानाच्या पाटीवर ठळक अक्षरात “सरकार मान्य” देशी दारूचे दुकान असे लिहिले जाते. दारूच्या दुकानावर “सरकार मान्य” लिहिणे हा राष्ट्रपित्याचा कठोर अपमान तर आहेच पण आपण नवीन पिढीवर काय संस्कार करतोय आणि कोणत्या राष्ट्राचे निर्माण करतोय हा मनाला भेडसावणारा प्रश्न फार गहन आहे.

सरकार मान्य गोष्ट ‘नैतिक’ असते असे या देशातील मुला-मुलींना वेगळे शिकवावे लागत नाही. देशी दारूच्या दुकानावर ‘सरकार मान्य’ हे शब्द वाचून विद्यार्थ्यांनी दारूला नैतिक मानावे कि आणखी कशाला ? या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही.

म्हणूनच राज्य शासनाने देशी दारूच्या दुकानावर लिहिलेले ‘सरकार मान्य’ हे शब्द तात्काळ काढून टाकण्याचे आदेश देण्यात यावेत असे निवेदन येथील चेतना व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने राज्य शासनाला देऊन मागणी करण्यात आली. चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक नितीन विसपुते यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब तसेच जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेब यांना ई-मेल द्वारे निवेदन सादर केले. व्यसनमुक्त समाजाचे आजन्म स्वप्न पाहणाऱ्या महात्मा गांधी यांना खऱ्या अर्थाने आदरांजली अर्पण करायची असेल तर देशी दारूच्या दुकानावरील पाट्यांवरून ‘सरकार मान्य हा शब्द तात्काळ काढून टाकण्यात यावा अशी मागणी राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक नितीन विसपुते यांनी केले
आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज