fbpx

रेमडेसिवीरच्या किमतीचा झोल आणि घोळ…

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज ।दिलीप तिवारी । अकोला येथील दत्त मेडिकलने रेमडेसिवीर इंजेक्शनच्या किमतीबाबत गेल्या महिन्या पासून बाजार उठवला आहे. महिनाभरापूर्वी दत्त मेडिकलने कोवीड प्रतिबंधाशी संबंधित औषधांच्या सर्वांत कमी किमतीची यादी सोशल मीडियात (फेसबुकवर) शेअर केली होती. रेमडेसिवीर इंजेक्शनची किंमत त्यात १०५० रुपये होती. मला धक्का बसला. जळगावमध्ये हेच इंजेक्शन ४ ते ६ हजारात विक्री होत होते. मी स्वतः सुनीलभाऊ भंगाळे यांना मेसेज पाठवून औषधांच्या किमती कमी होतील का ? अशी विनंती केली होती. सुनीलभाऊंनी उत्तर दिले, विक्रेत्यांशी बोलून प्रयत्न करतो. नंतर मीच विषय सोडून दिला. मात्र काल दत्त मेडिकलने रेमडेसिवीरची किंमत ७५० रुपये जाहीर केली. शिवाय, अकोल्यातील होलसेलर नवरत्न मेडिकलशी संपर्क करायचा सल्ला दिला. अर्थात, नवरत्न मेडिकलशी संबंधित मोबाइल क्रमांकवर संपर्क केला तर नीटपणे उत्तर मिळाले नाही. पैसा कमावण्याची संधी असताना कोणताही विक्रेता खरे उत्तर देणार नाही हा अनुभव आहेच.

जळगाव शहर व जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या ३ वेगवेगळ्या किमती समोर आल्या आहेत. चोपड्यात ९९९ रुपये, जळगावात रेडक्रॉस ११५० आणि विक्रेता संघटना १२०० रुपयात विक्री करीत आहेत. या तुलनेत अकोल्यात किमत ७५० रुपये आहे. हा सर्व घोळ समजून घेतला तर ‘मृताच्या टाळू वरील लोणी खाण्याचा’ प्रकार समोर येतो. रेमडेसिवीरची मूळ किंमत पूर्वीपासून ५०० रुपयांच्या आतच आहे. मात्र या इंजेक्शनचा वापर फारच क्वचित रुग्णांसाठी होत असे. त्यामुळे ६ नग विक्रीसाठी ठेवलेच तर ते कधी वापरात येतील याची शाश्वती नसे. म्हणून निर्मिती करणाऱ्या कंपन्या मूळ किंमत ५०० रुपये असताना एमआरपी ५ हजार छापत होते. म्हणजेच एक जरी इंजेक्शन विक्री झाले तर ६ ची किंमत आणि नफा २ हजार रूपये वसूल होत असत. पण कोरोनाच्या संसर्गाने फुफ्फुसांचे आजार सुरू केले आणि रेमडेसिवीरची लॉटरी लागली. अशावेळी विक्रेत्यांनी विवेक दाखवून मूळ ५०० रुपयांच्या तुलनेत किंमत बसूल करायला हवी होती. पण तसे झाले नाही.

रेमडेसिवीर संदर्भात कोणताही विक्रेता आज जर युक्तिवाद करीत असेल तर त्याने त्याच्या खरेदीची बीले, विक्रीची बीले व एकूण इंजेक्शन विक्रीची संख्या जाहीर करावी. हा सगळा प्रकार पाहून मी कालपासून विचार करतो आहे की, रेमडेसिवीर इंजेक्शन तयार करणारी कंपनी, होलसेल सप्लायर व किरकोळ विक्रेता यांची ईडी सारख्या यंत्रणेकडून तपासणी करायला हवी. कारण यात सर्व घोळ बिलांचा आहे. माझा वैयक्तिक अविश्वास कोणावरही नाही. कोणीशी शेतीच्या बांधावरील भांडणही नाही. तरी पण रेमडेसिवीर इंजेक्शनच्या किमतीने एका व्यवसायाविषयी शंकेचे वातावरण निर्माण केले आहे.

मला सर्वाधिक धक्का काल रात्री उशिरा बसला. रेमडेसिवीरची मागणी वाढल्याचे पाहून अनेक औषध निर्माण कंपन्या यात उतरल्या आहेत. त्यामुळे आता इंजेक्शनचे पर्याय भरपूर आहेत. त्यामुळे ७५०, ९९९, ११५० आणि १२०० अशा किमती समोर येत आहे. गंमत तर पुढे आहे. सिप्लाचे रेमडेसिवीर हे ६५० ला उपलब्ध आहे. त्याच वेळी मायलॉन कंपनीचे रेमडेसिवीर हे ५५० रुपयात उपलब्ध आहे. जर औषधाचा उत्पादन खर्च हा ५०० पेक्षा ही कमी असेल तर इतर सर्वच किमतींविषयी शंका येणारच. अशावेळी विक्रेता संघटनेने भूमिका स्पष्ट करायला हवी. सुनीलभाऊ भंगाळे काल म्हणाले, ‘विक्रेत्यांशी बोलून प्रयत्न करतो’ चला चांगले काही घडायची अपेक्षा करू या. नाही तरी राजकारणी मंडळींनी जळगावकरांना खड्ड्यांत टाकलेच आहे…

– दिलीप तिवारी, जेष्ठ पत्रकार 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज