जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । चाळीसगाव रेल्वे स्थानक हे चार जिल्ह्याच्या सीमेवर असलेले मोठे रेल्वे जंक्शन आहे. येथून मुबंई, दिल्ली जाण्यासाठी अनेक रेल्वे गाड्या धावतात. मात्र, पाहीजे तेवढ्या रेल्वे गाड्या चाळीसगाव रेल्वे स्थानकावर थांबत नाही. खान्देशवासियांना देवदर्शनाला जाण्यासाठी कर्नाटक एक्सप्रेस सोयीची ठरणार आहे. यामुळे कर्नाटक एक्सप्रेसला चाळीसगाव रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात यावा, अशी मागणी रयत सेनेकडून खासदार उन्मेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कर्नाटक एक्सप्रेसला चाळीसगाव स्थानकावर थांबा दिल्यास तिरुपती बालाजी, पंढरपूर, तुळजापूर, अक्लकोट येथे भाविकांना देवदर्शनासाठी जाण्यास सोयीचे होईल. तर पुणे येथे जाणाऱ्या प्रवाश्यांची संख्या मोठी आहे. त्याच बरोबर संभाजीनगर (औरंगाबाद) धुळे तसेच चाळीसगाव येथून अनेक गोरगरीब रूग्ण साई प्रशांती निलयम हॉस्पिटलला जात असतात .रुग्णांना तेथे जाण्यास कर्नाटक एक्सप्रेस सोयीची गाडी आहे. मात्र कर्नाटक एक्सप्रेसला चाळीसगावला थांबा नसल्यामुळे मनमाड किंवा जळगाव येथून जावे लागत असल्यामुळे त्यांची प्रवास करताना फरफट होते. आपण रेल्वे बोर्ड व रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करून कर्नाटक एक्सप्रेसला चाळीसगाव स्थानकावर थांबा दिल्यास अनेक गोरगरीब रुग्णांना या रेल्वे गाडीचा लाभ होणार आहे.
तसेच भुसावळ ते दौंड ही साप्ताहिक गाडी दर गुरुवारी धावते. तीच गाडी पुढे सोलापूरपर्यंत केल्यास विठ्ठल भक्तांना दर्शनासाठी सोयीस्कर होणार आहे. आपण रेल्वे बोर्ड व रेल्वे मंत्र्यांकडे रेल्वे गाड्यांसाठी पाठपुरावा करून प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी रयत सेनेच्यावतीने खासदार उन्मेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, जिल्हाध्यक्ष संजय कापसे, विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, विवेक देठे, अमोल पाटील, विठ्ठल पवार, राजेंद्र राठी आदींच्या सह्या आहेत. यावेळी माजी नगरसेवक संजय घोडेस्वार, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम उपस्थित होते.