रावेर नगरपालिकेतील सदस्य वाढणार, प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे रवाना

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२१ । गेल्या पंचवार्षिकला १७ सदस्यांसाठी झालेली रावेर नगरपालिकेची निवडणूक यंदा २४ सदस्यांसाठी होणार आहे. रावेर शहराची हद्द वाढ झाल्याने व शासनाने सदस्य संख्येत १७ टक्के वाढ केल्याने पालिकेतील सदस्य संख्या ७ ने वाढली आहे. त्यामुळे ही सदस्य संख्या २४ वर पोहोचली असून याबाबतचा प्रस्ताव नगरपालिकेकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.

रावेर नगरपालिका ही ‘क’ वर्ग नगरपालिका असून २०१७ मध्ये १७ नगरसेवक पदांसाठी या नगरपालिकेची निवडणूक झाली होती, तर लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी स्वतंत्रपणे मतदान प्रक्रिया पार पडली होती. दरम्यान रावेर शहराची २ वर्षांपूर्वी हद्द वाढ झाल्यामुळे नगरपालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर नागरी वस्त्यांचा समावेश झाला आहे. त्यामुळे शहराच्या लोकसंख्येत भर पडली असून २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ३९ हजार ५३३ एवढी झाली आहे. त्यात अनुसूचित जातीची संख्या ३०२० तर अनुसूचित जमातीची लाेकसंख्या १२३६ एवढी आहे. हद्द वाढ झाल्याने दोन प्रभाग वाढले असून ४ जागा वाढल्या होत्या. दरम्यान शासनाने लोकसंख्येच्या आधारावर १७ टक्क्यांनी सदस्य संख्येत वाढ केल्याने येथील नगरसेवकांच्या संख्येत आणखी ३ सदस्यांनी वाढ होणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला अहवाल
शासनाने निर्देशित केलेल्या लोकसंख्येनुसार नगरपालिकेच्या सदस्य संख्येत १७ टक्के वाढ केली आहे. त्यामुळे येथील पालिकेच्या २४ सदस्य संख्येचा अहवाल तयार करून मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना करण्यात आला आहे. मंजुरी मिळाल्यानंतरच सदस्य संख्या निश्चित होणार असल्याचे नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज