fbpx

खाजगी कोविड व नाॅन कोविड रूग्णालयांसाठी बायो-मेडिकल वेस्टचे दर निश्चित

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२१ । जळगाव जिल्ह्यात कोविड-19 बाधित रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्यामुळे व जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध असणारे बेड्स, इतर वैद्यकीय सुविधा कोविड-19 बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी अपुऱ्या पडत असल्याने जळगाव जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांना कोविड-19 बाधित रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. 

खाजगी कोविड रुग्णालयांना शासनाकडून कोविड-19 बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी निश्चित करुन देण्यात आलेले शुल्क/दर लागू आहेत. तथापि, बायो-मेडिकल वेस्टच्या दराबाबत शासनस्तरावरुन कोणत्याही सुचना, दर निश्चित करुन देण्यात आलेली नाहीत. सद्य:स्थितीत जळगाव जिल्ह्यातील काही खाजगी कोविड रुग्णालयांकडून बायो-मेडीकल वेस्ट च्या नावाखाली अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने खाजगी कोविड रुग्णालयांसाठी बायो-मेडीकल वेस्टचे दर निश्चित करुन देणे क्रमप्राप्त आहे. 

GRF Advt

या पार्श्वभुमीवर जळगाव जिल्ह्यातील खाजगी कोविड तसेच नॉन कोविड रुग्णालयांकरिता बायो-मेडीकल वेस्ट डिस्पोजल करिता सर्व खाजगी कोविड व नॉन कोविड रुग्णालये यांच्यासाठी रुपये 250/- प्रति दिन, प्रति रुग्ण असे आहेत. 

नमूद केलेल्या दरानुसारच जळगाव जिल्ह्यातील सर्व खाजगी रुग्णालयांनी बायो-मेडीकल वेस्टबाबत शुल्क आकारणी करावी. तथापि, याबाबत असे देखील स्पष्ट करण्यात येते की, ज्या रुग्णालयांकडून कोविड-19 बाधित रुग्णांवर उपचारासाठी शासनाने निश्चित करुन दिलेल्या दरापेक्षा अधिक/जादा बिल आकारणी करतील. ते रुग्णालये बायो-मेडीकल वेस्टच्या शुल्काकरिता जास्तीत जास्त 250/- रुपये प्रति दिन इतक्या रकमेच्या वसुलीस पात्र राहतील. असे अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. 

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज