⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ | रेल्वेच्या लाचखोर मंडळ अभियंत्यांच्या घरात सापडले १५ लाखांचे घबाड

रेल्वेच्या लाचखोर मंडळ अभियंत्यांच्या घरात सापडले १५ लाखांचे घबाड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२१ । मंजूर झालेल्या दोन निविदांची वर्क ऑर्डर (स्वीकृतीपत्र) देण्यासाठी दोन लाख ४० हजारांची लाच स्वीकारताना भुसावळ रेल्वे डीआरएम कार्यालयातील मंडळ अभियंता (विशेष कार्य, वर्ग- 1) एम.एल.गुप्ता व अभियांत्रिकी विभागातील कार्यालय अधीक्षक संजय रडे (ओ.एस.) यांना कार्यालयातच नागपूर सीबीआयच्या पथकाने सोमवारी दुपारी अटक केली होती. दरम्यान, सायंकाळी उशिरा गुप्ता यांच्या निवासस्थानातून सीबीआय अधिकार्‍यांना १५ लाखांचे घबाड व काही महत्वपूर्ण कागदपत्रे सापडले आहेत. गुप्ता यांच्या बर्‍हाणपूर, पुणे व मुंबईतील निवासस्थानांवरही छापे टाकण्यात आले आहेत.

कंत्राटदाराची सीबीआयकडे तक्रार
सूत्रांच्या माहितीनुसार, मलकापूर येथील एमएनवाय कन्सल्टिंग प्रा.लि. कंपनीने विविध कामासंदर्भात तीन निविदा भरल्या होत्या. त्यातील एक निविदा रद्द झाली मात्र दोन निविदा सर्वात कमी दराची (लोवेस्ट) असल्याने त्या मंजूर ऑनलाईन करण्यात आल्या होत्या. मंजूर निविदांची वर्कऑर्डर देण्यासाठी संशयीत आरोपी गुप्ता यांनी चार लाख तर संजय रडे यांनी ४० हजारांची लाच मागितल्याने नागपूर सीबीआयकडे तक्रार करण्यात आली होती. काम होण्यापूर्वी दोन लाख व वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर गुप्ता यांनी दोन लाखांची मागणी केली होती.

पथक तीन दिवसांपासून भुसावळात तळ ठोकून
तक्रारदाराच्या तक्रारीनंतर सीबीआयने लाचेची पडताळणी करीत तक्रार दाखल करून घेतल्यानंतर सापळा रचला होता. गेल्या तीन दिवसांपासून भुसावळात सीबीआयचे पथक खाजगी हॉटेलमध्ये तळ ठोकून होते. सोमवारच्या दिवशी संशयीत आरोपींनी लाच स्वीकारण्याचे तक्रारदाराला सांगितल्याने नागपूर सीबीआयचे उपअधीक्षक एस.आर.चौगले व उपअधीक्षक दिनेश तळपे या अधिकार्‍यांच्या नेतृत्वात 16 पुरूष अधिकारी व दोन महिला अधिकार्‍यांनी सापळा रचला. संशयीत आरोपींनी आपापल्या दालनातच लाच स्वीकारल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.


गुप्तांच्या घरात आढळली लाखोंची रोकड

गुप्ता व रडे यांना सीबीआय पथकाने अटक केल्यानंतर गुप्ता यांच्या ताप्ती क्लबजवळील ऑफिसर कॉलनीतील निवासस्थानावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात पथकाला सुमारे १५ लाखांची रोकड सापडल्याचे सूत्रांनी सांगितले तर गुप्ता यांच्या मुंबईसह पुण्यातील मालमत्तांवरही सीबीआयने एकाचवेळी छापे टाकत झाडा-झडती सुरू केली असून त्यात काय आढळले हे रात्री उशिरापर्यंत कळू शकलेले नाही. दरम्यान, रडे यांच्या श्री स्वामी समर्थ कॉलनीतील निवास्थानावरही छापा टाकून झडती घेण्यात आली मात्र त्यात काय आढळले हे कळू शकले नाही.

या निविदांच्या वर्क ऑर्डरसाठी मागितली लाच
सूत्रांच्या माहितीनुसार, सेंट्रल झोन परीसरातील कर्मचारी क्वार्टर आणि सेवा इमारतीच्या दुरुस्तीच्या कामाच्या निविदा प्रक्रियेत जुलै २०२१ मध्ये तक्रारदाराची फर्म एल-१ म्हणून शॉर्ट लिस्टेड असल्याचा आरोप करण्यात आला होता. तक्रारदाराने कोचिंग केअर सेंटर अपग्रेडेशन कामासाठी व एचएचबी कोचच्या एसएस-१ देखभालीसाठी निविदा भरल्यानंतर वर्क ऑर्डरसाठी संशयीत आरोपी गुप्ता यांनी चार लाख तर रडे यांनी ४० हजारांची लाच मागितली होती.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.