रायसोनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी बनविले सौर ऊर्जेवरील “शुद्ध जल संयंत्र”

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२२ । पारंपारिक उर्जास्त्रोताच्या तुटवड्यामुळे व जास्त मागणीमुळे उर्जेच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या उर्जेला पूरक किंवा पर्यायी उर्जा म्हणून सौर उर्जा हे एक उत्तम माध्यम म्हणून आपल्या सर्वांच्या समोर सकारात्मकतेने उभे आहे. या अनुषंगाने शहरातील जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मेनेजमेंट महाविदयालयाच्या विद्युत विभागातील प्रसाद पाटील, कुणाल सोनिग्रा, मंगेश मोहोरकर, मंथन इशी, प्रतिक चौधरी या विध्यार्थ्यानी विद्युतवर चालणाऱ्या वॉटर प्युरीफायरच्या समस्येवर सौर उर्जेवरील स्वयंचलित असे जल-शुद्धीकरण प्रकल्पाचे निर्माण केले आहे.

हा प्रकल्प रायसोनी महाविद्यालयातील विद्युत विभागप्रमुख बिपासा बी. पात्रा व प्रा. मनीष महाले यांच्या मार्गदर्शनाखाली विध्यार्थ्यानी यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे या प्रकल्पाच्या पुढील भविष्यासाठी रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितम रायसोनी व संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल, ऍकेडमिक डीन प्रा.डॉ.प्रणव चरखा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

दुर्गम भागांत तसेच समुद्रकिनाऱ्यावर पिण्यायोग्य शुद्ध पाणी मिळवण्यासाठी या सौर शुद्धजल संयंत्राचा वापर करता येतो. हे यंत्र सौरऊर्जेवर चालते त्यामुळे प्रदूषण होत नाही. या संयंत्रासाठी खर्चही कमी येत असल्यामुळे स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. समुद्राच्या खाऱ्या, मचुळ पाण्याचे तसेच अशुद्ध पाण्याचे गोड्या पाण्यात, शुद्ध पाण्यात रूपांतर करण्यासाठी या सौर शुद्धजल संयंत्राचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ शकतो. सौर शुद्धीजल यंत्रणेद्वारे मोठ्या प्रमाणावर गोड्या पाण्याची सोय केली जाऊ शकते.

सौर ऊर्जेच्या जल-शुद्धीकरण प्रकल्पाचे फायदे

· कोणत्याही प्रकारच्या (विद्युत) खर्चिक ऊर्जेची गरज भासत नाही.

· गढूळ / मचूळ पाण्याचे रूपांतर शुद्धजलामध्ये करता येऊ शकते.

· या संयंत्रामध्ये कोणताही गंजणारा भाग नसून वापरण्यास अत्यंत सोपे आहे.

· दुर्गम भागात तसेच समुद्रकिनाऱ्यावर पिण्यायोग्य शुद्ध पाणी मिळवता येते.

· कोणतेही प्रदूषण होत नसून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

वैशिष्ट्ये

· या सौरशुद्धजल संयत्राद्वारे दररोज २ ते २.५ लिटर शुद्ध पाणी मिळते.

· हे संयंत्र वापरण्या करिता पारंपरिक विद्युत ऊर्जेची आवश्यकता नाही.

· या संयंत्राच्या वापरामुळे पर्यावरणाची कोणत्याही प्रकारची हानी होत नाही.

कार्यप्रणालीवर परिणाम करणारे घटक

सौर किरणे हे सौर शुद्धजल संयंत्राचे कार्यक्षमता सौर किरणावर अवलंबून असते. शुद्धजलाची निर्मिती ही सौर ऊर्जेच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. जर सौर किरणांची तिव्रता जास्त असेल, तर सौर शुद्धजल संयंत्राची उत्पादन क्षमता वाढते. वातावरणामध्ये वाऱ्याची गती जशी वाढत जाते, त्याप्रमाणे शुद्धजल संयंत्रातील उष्णतामान कमी होते. वाऱ्याची गती जर कमी असेल, तर संयंत्रापासून जास्त प्रमाणात शुद्धजल प्राप्त होते. वातावरणातील तापमान जसे-जसे वाढत जाते, त्याप्रमाणात सौर शुद्धजल संयंत्राची उत्पादन क्षमता वाढत जाते. संयंत्रामधील गढूळ पाण्याची पातळी जास्त असेल तर आतील पाण्याचे तापमान कमी राहते. त्यामुळे संयंत्राची उत्पादन क्षमता कमी होते. उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी पाण्याची पातळी कमीत कमी ठेवणे आवश्यक आहे.

संयंत्रामधील काचेचा उतार संयंत्रातील वरील बाजूस असलेल्या काचेचा उतार कमीत कमी असेल तर उत्पादन क्षमता जास्त असते, परंतु काचेचा उतार जर जास्त असेल, तर पाण्याचे थेंब संयंत्राच्या संकलन पाईपमध्ये न जाता संयंत्रामध्येच पडतात. त्यामुळे काचेचा उताराचा कोन २०-३० अंशामध्ये असावा.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -