जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२२ । यावल शहरात रविवारी एका अज्ञात वाहनाच्या धडकेने श्वानाचे पिल्लू गंभीर जखमी झाले. गावातील पशुप्रेमी डॉ. विवेक अडकमोल यांनी या पिलावर उपचार करत त्यास जीवदान दिले. वाहन चालवताना प्राण्यांना इजा होणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
भुसावळ रस्त्यावरील फालक नगरा जवळ रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास एका अज्ञात वाहनाच्या धडकेने श्वानाच्या लहानशा पिल्लास धडक दिली. यात त्याच्या पायाला जबर दुखापत झाली. रस्त्यावर ते पिल्लू रक्तबंबाळ अवस्थेत विव्हळत पडले होते. या भागातील धीरज फेगडे यांनी लगेच गावातील डॉ. विवेक अडकमोल यांना माहिती दिली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता उपचाराचे सर्व साहित्य घेवून घटनास्थळी दाखल झाले. आणि जखमी श्वानावर तातडीने उपचार करून माणुसकीचे दर्शन घडवले.
पशुपक्षी, मुक्या प्राण्यांवर मोफत उपचार
शहर व परिसरातील मोकाट गुरे, श्वानासह विविध पक्षी जर कुठे जखमी अवस्थेत कुणाला आढळले तर त्वरित माझ्याशी संपर्क साधा, असे त्यांनी उपस्थिताना सांगितले. पशुप्रेमी डॉ.अडकमोल हे निस्वार्थपणे जखमी पशुपक्षी, मुक्या प्राण्यांवर उपचार करत असतात.