एस.टी.कर्मचाऱ्यांच्या संपाला कोळी समाजाचा जाहिर पाठिंबा

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२१ । एस.टी. महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, याप्रमुख मागणीसाठी राज्यभरातील एस.टी. कर्मचाऱ्यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून संप पुकारला आहे. दरम्यान, एस.टी. कर्मचाऱ्यांच्या या संपाला चोपडा तालुक्यातील कोळी समाजाने पाठिंबा जाहीर केला आहे, अशी माहिती महर्षी वाल्मिकी कोळी समाज मंडळाचे तालुका संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर यांनी पत्रकान्वये दिली आहे.

एस.टी. तोट्यात दाखवून जनतेच्या पैशातून मिळालेल्या सार्वजनिक मालमत्तेचे खासगीकरण करून जनतेची गैरसोय करू पाहणाऱ्या शासन व प्रशासनाला वेळीच विरोध झाला पाहिजे. एस.टी. महामंडळ हा शासनाचाच एक भाग असून त्याचे खाजगीकरण करणे हा सुद्धा तुघलकी निर्णय ठरणार आहे. एस.टी.चे सरकारीकरण झाले तर महामंडळातील भ्रष्टाचार थांबेल. राज्यात एस.टी.च्या माध्यमातून दळणवळणाला बळकटी येणार आहे. प्रवासी जनतेला मिळणाऱ्या सेवा सवलती टिकून राहतील. तिकिट दरात मोठी कपात होईल. त्यामुळे एस.टी.महामंडळाच्या माध्यमातून शासनाची आर्थिक बाजु भक्कम होईल. परंतु एस.टी.चे खाजगीकरण झाल्यास एस.टी.चा प्रवास महाग होईल. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, पत्रकार, अंध, अपंग व दैनिक प्रवासी यांना कोणतीच सवलत मिळणार नाही. प्रवासी भाडे जास्तीचे आकारून जनतेची लूट होईल. हे थांबवण्यासाठी एस.टी.चे सरकारीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपाला सामान्य जनता व प्रवाशांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहनही जगन्नाथ बाविस्कर यांनी केले आहे.

संपकरी कर्मचाऱ्यांना निलंबित करणे, आगारातून बाहेर काढणे, पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह वापरास बंदी करणे असा त्रास दिला जात आहे. ज्या खाजगी प्रवासी वाहनांना आगाराच्या आजूबाजूला थांबू दिले जात नव्हते, आज त्या वाहनांना प्रवासी वाहतुकीसाठी आगारात जागा दिली जात आहे. संपकाऱ्यांच्या समस्या जाणुन घ्यायला भाजप व्यतिरिक्त इतर कोणीही पोहोचलेले नाही. ही खेदाची व माणुसकी शुन्य बाब आहे. असे मार्केट कमिटीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर यांनी सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज