१४० रुपये रोजाने काम करणाऱ्या खिर्डीच्या तरुणाची पीएसआयपर्यंत झेप ; वाचा प्रेरणादायी कहाणी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्युज | २६ ऑगस्ट २०२१ | लहानपणापासूनच मिळेल ते काम करण्याची आवड… सतत काहीतरी नविन शिकण्याची जिज्ञासा…या जिज्ञासेतूनच १४० रुपये रोजाने कामासाठी येणार्‍या गणेश कोळी या तरुणाने वेळेचा सदुपयोग करत थेट पीएसआय पदापर्यंत घेतलेली झेप ही निश्‍चितपणे आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे.

जळगाव तालुक्यातील खिर्डी या छोट्याशा गावातील रहिवासी असलेले शालिक कोळी ह्यांचा एकुलता एक मुलगा गणेश कोळी हे आज जळगावातील सायबर सेल विभागात पीएसआय म्हणून कार्यरत आहे. पीएसआयपर्यंतच्या या प्रवासाबाबत गणेश कोळी यांनी गोदावरी साप्ताहिकाशी दिलखुलास संवाद साधला.

गणेश कोळी यांनी संवाद साधतांना सांगितले की, माझ्या आयुष्यात कुठलीही गोष्ट मी ठरवून केली नाही, सर्वकाही अनपेक्षितपणे घडत गेले आणि त्याचा स्विकार मी केला. लहानपणापासून मिळेल ते काम करण्याची आवड होती. यात सायकलवरुन किराणा विकणे, रोजाने कामाला जाणे, टिव्ही, मोबाईल रिपेअरिंग करणे असे कोर्सेस करुन ग्रामस्थांना सेवा देणे असा माझा नित्यक्रम असायचा.

भुसावळ येथील तु.स.झोपे शाळेतून माझ चौथी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण झाले, त्यानंतर नशिराबाद येथील शाळेतून मी पुढील शिक्षण घेतले. कला शाखेतून पदवी संपादन करण्यासाठी मी जळगाव येथील एम.जे.कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

दरम्यानच्या काळात मी गोदावरी फाऊंडेशन येथे १४० रुपये रोजाने कामाला लागलो, त्यावेळी अन्नपूर्णालयमचे राजपुरोहित डी.टी.राव सर यांनी मला सांगितले की, तु हुशार आहेस, स्पर्धा परिक्षा दे, त्यासाठी अभ्यास करण्यासाठी वेळेची अ‍ॅडजस्टमेंट करुन दिली.

त्यानुसार मी स्पर्धा परिक्षांचा अभ्यास सुरु केला, त्यात पहिल्याच प्रयत्नात मी तलाठी पदाची परिक्षा पास झालो आणि जामनेर तालुक्यातील ढालगाव येथे २०१० मध्ये मी तलाठी होतो, त्यानंतरही मी अभ्यास सुरुच ठेवला. पीएसआय पदासाठी मी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेली परिक्षा दिली आणि त्यातही उत्‍तीर्ण झालो. सर्वप्रथम २०१५ मध्ये पालघर येथे माझी पोस्टिंग झाली. नंतर नाशिक आणि २०१९ पासून जळगाव येथील सायबर सेल येथे कार्यरत आहे. जळगाव जिल्ह्यातील सायबर सेलशी संबंधित कामे आमच्या विभागामार्फत केली जातात.

तरुणांनो वेळेचा सदुपयोग करा – कोळी
आयुष्यात वेळ ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, एक एक सेंकदही वाया जावू नये असे वेळापत्रक करावे. तुम्हाला ज्याही गोष्टीची आवड आहे त्यात तुम्ही स्वत:ला झोकून द्या. कुठलेही काम लहान किंवा मोठे नसते, फक्‍त तुम्ही ते कसे करतात, त्यावर त्या कामाचे यश, अपयश अवलंबून असते. त्यामुळे तरुणांनो, वेळेचा सदुपयोग करा असा संदेश पीएसआय गणेश कोळी यांनी दिला.

दरम्यान, पीएसआय गणेश कोळी यांचा गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील समवेत जळगाव खुर्दचे उपसरपंच दिनेश पाटील, प्रशासन अधिकारी आशिष भिरुड यांनी सत्कार केला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar