शासकीय योजनांचे प्रस्ताव ऑफलाईन सादर करता येणार

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजनेसह विविध योजनांचे प्रस्ताव आता ऑफलाईन पद्धतीनेही सादर करता येणार आहे. त्यामुळे लाभार्थांची तांत्रिक अडचणीतुन सुटका होणार आहे. त्यामुळे मुक्ताईनगर तहसील कार्यालयांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रकरणे ऑफलाईन सादर करण्याचे आवाहन तहसील कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

मुक्ताईनगर तहसील कार्यलयात इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजना, इंदिरा गांधी विधवा योजना, इंदिरा गांधी अपंग योजना, संजय गांधी श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना अशा विविध प्रकारच्या शासकीय योजना राबविण्यात येत असतात. त्यासाठी पात्र लाभार्थ्यांना आँनलाईन पद्धतीने प्रस्ताव सादर करावा लागत होता. या ऑनलाईन पद्धतीमुळे योजनेचा लाभ मिळण्यास विलंब होत होता. तर काही वेळा तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे आता मुक्ताईनगर तहसील कार्यालयाकडून ऑफलाईन पद्धतीने प्रस्ताव सादर करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे या योजनांसाठी प्रस्ताव सादर करणाऱ्या लाभार्थ्यांची या अडचणींपासून सुटका होणार आहे.

या दिवशी करता येणार प्रस्ताव सादर
ऑनलाईन प्रस्ताव सादर करताना येणाऱ्या अडचणीतुन लाभार्थ्यांची सुटका व्हावी व योजनेचे प्रस्ताव विनाविलंब मंजुर करता यावे, या हेतूने तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना कक्षात संबधित प्रकरणे ऑफलाईन पद्धतीने स्विकारण्यात येणार आहे. तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांनी योजनेप्रमाणे शासनाने ठरवुन दिलेले कागदपत्रे स्वत: जमा करावी, असे आवाहन प्रभारी तहसीलदार निकेतन वाडे यांनी केले आहे. यासाठी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या गुरुवारी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेदरम्यान संबंधित कागदपत्रांच्या झेराक्स व सत्यप्रती स्वत: लाभार्थ्याला समक्ष उपस्थित राहुन प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. लाभार्थ्यांनी कुठल्याही दलालाच्या भुलथापांना बळी पडू नये व आर्थिक व्यवहार करू नये असे आवाहनही तहसील कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज