पोलीस इन ॲक्शन मोड, …आता सज्जनाला सलाम, दुर्जनावर प्रहार

जळगाव लाईव्ह न्यूज | २४ सप्टेंबर २०२१ | गेल्या ५ वर्षातील गुन्हेगारांच्या हालचाली आणि गुन्ह्यांचा आढावा घेणे सुरू असून गुन्ह्यांच्या व्याप्तीनुसार यापुढे त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. गुन्हेगारी संपविण्यासाठी नागरिकांकडून देखील सहकार्य अपेक्षित आहे. जळगावात यापुढे सजन्नांना सलाम आणि दुर्जनांवर प्रहार अशी पोलीस प्रशासनाची भूमिका असणार असल्याचे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा हॉलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा, अर्चित चांडक यांची उपस्थिती होती.

पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर म्हणाले की, जिल्ह्यात गावठी कट्टे, पिस्तुल, शस्त्र वापरणाऱ्यांची माहिती काढणे सुरू आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना २ गुन्हेगारांची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. अवैध सावकारीत २४ ते ६० टक्के दराने कर्ज देण्यात येते, शेतकरी, मजूर वर्ग त्यात पिळला जात असून त्यांच्या मालमत्ता लिहून घेतल्या जात आहेत. ज्या नागरिकांची अवैध सावकारीमुळे फसवणूक झाली असेल त्यांनी संपर्क साधल्यास कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

अवैध पिस्तूल विक्रीचे उगमस्थान नष्ट करणार
जिल्ह्यात येणाऱ्या अवैध गावठी कट्टे आणि काडतुस हे बहुतांश उमर्टी, मध्यप्रदेश येथून येत असल्याची माहिती आहे. गगावठी कट्टे विक्रीच्या उगमस्थानाचे उच्चाटन करण्यासाठी एक अँक्शन प्लॅन तयार करण्यात आला असून लवकरच तो अंमलात आणण्यात येणार असल्याचे महानिरीक्षकांनी सांगितले.

प्रत्येक उपविभागातून २ मोक्का, २ एमपीडीए कारवाया
जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा घालून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात येणार आहे. प्रत्येक उपविभागात सहाय्यक अधीक्षकांना गुन्हेगारांची पार्श्वभूमीवर पाहून २ गुन्हेगारांना मोक्का आणि २ गुन्हेगारांवर एमपीडीए लावण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात ७ कोटी खर्चून बसविणार ५०० सीसीटीव्ही कॅमेरे
जिल्ह्यातील संवेदनशील परिसरात असलेल्या पोलीस चौकी सुरू करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करण्यात येईल. आगामी काळात नवीन पोलीस भरती देखील होणार आहे. शहरासह जिल्ह्यात संवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी एका संस्थेमार्फत प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. जवळपास ७ कोटी खर्चून ५०० सीसीटीव्ही कॅमेरे डीपीडिसीच्या माध्यमातून बसविण्यासाठी प्रयत्न सुरू असून पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याशी याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी दिली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज