त्या’ पोलिसांवर आज कारवाई होण्याची शक्यता!

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२१ । चाळीसगाव येथील कन्नड घाटात आ.मंगेश चव्हाण यांनी स्टिंग ऑपरेशन करीत पोलिसांकडून होणाऱ्या वसुलीचा पर्दाफाश केला होता. दरम्यान, या संदर्भातील वस्तुस्थितीदर्शक सविस्तर अहवाल चाळीसगाव अपर पोलीस अधिक्षकांनी दिल्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी जळगाव लाईव्हशी बोलताना दिली. आज शुक्रवारी कारवाईची शक्यता आहे.

चाळीसगाव येथील कन्नड घाटातून अवजड वाहनांना वाहतूक करण्यास बंदी असताना देखील रात्रीच्या वेळी पैसे घेऊन वाहतूक सुरू असते. काही दिवसांपूर्वी याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. गुरुवारी रात्री आ.मंगेश चव्हाण यांनी ट्रक चालक होऊन वसुलीचा पर्दाफाश केला होता. तसेच संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दोन दिवसात कारवाई न झाल्यास गृहमंत्र्यांना भेटून तक्रार देणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

गुरुवारी सायंकाळी आ.मंगेश चव्हाण यांनी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली. पोलीस अधिक्षकांनी चाळीसगाव अपर पोलीस अधिक्षकांना बोलावून सविस्तर माहिती घेतली आणि कारवाईचे आश्वासन दिले. दरम्यान, कन्नड घाटातील प्रकाराबाबत वस्तुस्थितीदर्शक सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर ‘त्या’ पोलिसांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.प्रवीण मुंढे यांनी जळगाव लाईव्हशी बोलताना दिली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज