आफ्रिकेत कोरोनाच्या नव्या विषाणूचा उद्रेक, मोदींनी बोलावली तातडीची बैठक

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ नोव्हेंबर २०२१ । गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनाची दोन हात करत आहे. अनेक ठिकाणी मागील काही दिवसापासून कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली असता त्यात आता दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या ‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे जगाची चिंता वाढली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत ते कोरोना विषाणू संसर्गाच्या स्थितीचा आणि कोरोना लसीकरणाचा आढावा घेतील. या बैठकीचं अध्यक्षपद नरेंद्र मोदी यांच्याकडेच असेल.

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूच्या वेरिएंटसंदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. यूरोपमधील कोरोना विषाणू संसर्गामुळं निर्माण झालेली परिस्थिती आणि दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूच्या वेरिएंटसंदर्भात भारतानं कोणती काळजी घ्यावी आणि उपाययोजना करावी, यासंदर्भात तातडीच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदींनी बोलावलेल्या या बैठकीला पंतप्रधानांचे प्रधान सचिव पीके मिश्रा, आरोग्य सचिव राजेश भूषण आणि NITI आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल हे देखील उपस्थित राहणार आहेत. देशातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कोरोना वेगाने पसरत असताना पंतप्रधान मोदींनी ही बैठक बोलावली आहे. कर्नाटक, तेलंगणा, राजस्थान, ओडिशा यासह देशातील विविध राज्यांतून विद्यार्थी आणि शिक्षक कोरोनाच्या विळख्यात आल्याचे वृत्त आहे.

कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे जगभरातील देशांची चिंताही वाढली आहे. अमेरिकेसह अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय उड्डाणे, विशेषत: दक्षिण आफ्रिकेतील उड्डाणे याबाबत कठोरतेची घोषणा केली आहे, तर भारत त्या सुरू करण्याच्या तयारीत आहे. एक दिवस अगोदर नागरी उड्डाण मंत्रालयाने 15 डिसेंबरपासून जवळपास वर्षभरापासून रखडलेली आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीचे दोन्ही डोस मिळाल्यानंतरही लोक संसर्गास बळी पडत आहेत. यामुळे सरकारचीही चिंता वाढली आहे.

केंद्राचे राज्यांना अलर्ट राहण्याचे आदेश

भारत सरकारचे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दक्षिण आफ्रिकेतील नव्या वेरिएंटच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे. कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळं व्हिसा संबंधी आणि देशात येण्यासाठी देण्यात आलेली सूट यामुळं देशासमोरील अडचणी वाढू शकतात त्यामुळं परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करण्यात यावी, अशा सूचना राज्य सरकारांना देण्यात आल्या आहेत.

हा देश धोक्याच्या यादीत आहे
शुक्रवारी एका परिपत्रकात आरोग्यमंत्र्यांनी युनायटेड किंगडम, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बांगलादेश, बोस्टवाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, सिंगापूर, हाँगकाँग, इस्रायल या युरोपीय देशांना धोक्याच्या यादीत टाकले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -