जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२३ । जळगाव शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारीने डोकं वर काढलं असून चोऱ्या, खुनाच्या घटना गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणत वाढल्याचे दिसून येत आहे. त्यात बेकायदेशीर गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. अशातच 9वीच्या विद्यार्थ्याकडे गावठी पिस्तूल आढळून आल्याची धक्कदायक घटना समोर आलीय.
हा प्रकार भुसावळ शहरापासून जवळच असलेल्या अकलूद येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये उघडकीस आला आहे. यामुळे शिक्षकही या प्रकारामुळे चक्रावले असून शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. संशयित मुलाविरुद्ध शाळेच्या प्राचार्यांच्या फिर्यादीनुसार फैजपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळातील एका भागातील रहिवासी कर्मचार्याचा मुलगा हा अकलूदजवळील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिक्षण घेतो. शुक्रवारी नेहमीप्रमाणे सकाळी शाळा भरल्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी केल्यानंतर नववीच्या एका विद्यार्थ्याकडे गावठी पिस्तूल आढळून आल्याने शिक्षकांमध्येही खळबळ उडाली होती.
शाळा प्रशासनाला ही बाब कळवल्यानंतर फैजपूर पोलिसांना माहिती दिल्यानंतर सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ व सहकार्यांनी धाव घेत कट्टा जप्त केला तर विद्यार्थ्यालाही चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी संशयित विधिसंघर्षित विद्यार्थ्याविरोधात पोदार शाळेचे प्राचार्य आनंद हिरालाल .शहा यांनी फिर्याद दिल्यावरून फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.