⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

इंधन दरवाढीचा भडका : पेट्रोल पाठोपाठ डीझेल दरवाढीची शतकाकडे वाटचाल

जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ जुलै २०२१ । एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत. त्यातच मागील दोन महिन्यांपासून पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधन दरवाढीचा सपाटा अद्यापही सुरुच आहे. आज बुधवारी पेट्रोल ३५ पैसे आणि डिझेल १७ पैशांनी वधारले आहे. त्यामुळे जळगावमध्ये एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.४१ रुपयांवर गेले आहे. तर डिझेलचा भाव ९६.७२ रुपये इतका झाला आहे.

मागील गेल्या काही दिवसात पेट्रोल आणि डीझेल दरात प्रचंड वाढ झाली आहे. देशभरातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल दराने शंभरी पार केली आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे. दरम्यान, जळगावमध्ये जून २०२१ च्या सुरवातीला पेट्रोलचा दर १०१.३३ रुपये प्रति लिटर होता. तो आज १०७.४१ रुपये पर्यंत आहे. तर याच महिन्याच्या सुरुवातील डीझेल ९१.८६ रुपये प्रति लिटर होते. ते आज ९६.७२ प्रति लिटर झाले आहे.  

दरम्यान, केंद्र सरकारने मार्च 2020 ते मे 2020 या पेट्रोवरील सेस आणि सरचार्जमध्ये 13 रुपये तर डिझेलवरील सेल आणि सरचार्जमध्ये तब्बल 16 रुपयांची दरवाढ केली आहे. चालू आर्थिक वर्षातील परिस्थिती पाहता पेट्रोल-डिझेलची मागणी 14 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, इंधनाच्या दरात कपात न झाल्यास ही मागणी 13 टक्क्यांपर्यंत खाली घसरेल. 2021 मध्ये आतापर्यंत पेट्रोलची मागणी 10.6 टक्क्यांनी घटली आहे. तर इंधनावरील करापोटी केंद्र सरकारला मिळणाऱ्या उत्पन्नात 55 टक्क्यांनी वाढ होऊ ते 3.5 लाख कोटी इतके झाले आहे.

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.