fbpx

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ ; वाचा आजचे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२१ । खाद्य पदार्थांपासून पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडर्सच्या दरांमध्ये होणारी दरवाढ थांबण्याचं नावच घेत नाहीये. पेट्रोलियम कंपन्यांनी आज (रविवारी) म्हणजेच, १० ऑक्टोबर रोजी सलग सहाव्या दिवशी पेट्रोल-डीजलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात ३० पैसे तर डिझेलच्या दरात ४७ पैशांनी वाढ केली आहे. त्यामुळे जळगावमध्ये पेट्रोल प्रतिलीटरसाठी १११ रुपयाहून अधिक पैसे मोजावे लागत आहेत. तर डीझेल ९९.८९ रुपयापर्यंत आहे.

जळगावमध्ये १ जानेवारी २०२१ रोजी पेट्रोल दर प्रति लिटर ९१ रुपयापर्यंत होते. ते आज १११ रुपयांवर गेले आहे. म्हणजेच गेल्या १० महिन्यात पेट्रोल दर जवळपास २० रुपयाने महागले आहे. तर दुसरीकडे गेल्या आठवड्यात डिझेल दर जवळपास ३ रुपयाने महागले आहे. २०२१ सुरवातीला डिझेल चा दर ८० रुपये होता. तो आता ९९ रुपयांवर गेला आहे. म्हणजेच डिझेलच्या दरात देखील गेल्या १० महिन्यात २० रुपया पर्यंतची वाढ झाली.

गेल्या महिन्यात (सप्टेंबर) एकवेळा ३८ पैशांनी पेट्रोलचे दर कमी झाले होते. त्यानंतर दिवसेंदिवस भाव वाढते असल्याने सामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. बजेट कोलमडून महिन्याच्या खर्चात सरासरी वीस टक्के वाढ झाली आहे.

जगभरात कच्च्या तेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशातच पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचंही पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, परंतु, उत्पादन मात्र कमी आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या ओपेक देशांची बैठक पार पडली, त्यामध्ये दररोज केवळ 4 लाख बॅरल उत्पादन वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे कच्च्या तेल्याच्या किमतींमध्ये वाढ होत आहे. जेव्हा जगभरात कच्च्या तेलाच्या किमती वाढतात, त्यावेळी देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ होणं, सामान्य बाब आहे.

देशात अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलनं ओलांडली शंभरी 

देशातील 26 राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर 100 रुपयांच्या पार पोहोचले आहेत. जम्मू-कश्मीर, आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपूर, नागालँड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, नागालँड, पुडुचेरी, तेलंगाना, पंजाब, सिक्किम, उडीसा, केरल, तमिलनाडु, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि राजस्थानच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपये प्रति लिटरच्या पार आहेत.

आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कळस गाठत असताना घरगुती गॅस सिलेंडरच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी बुधवारी विनाअनुदानित १४.२ किलोच्या सिलेंडरच्या दरात १५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे जळगावात विनाअनुदानित गॅस सिलेंडरची किंमत ९०४.५० रुपये इतकी झाली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज