बलिकेवर अत्याचार करणाऱ्याला १० वर्षाची शिक्षा, पाचोरा येथील घटना

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२१ । पाचोरा शहरातील सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी भैय्या भरत गायकवाड याला आज न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावास आणि ३५ हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. श्रीमती एस.एन.माने यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

पाचोरा शहरातील ७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दि.७ मार्च २०१८ रोजी दुपारी १२. ३० वाजेच्या सुमारास आरोपी भैय्या भरत गायकवाड (वय-२२) रा. पाचोरा याने मोबाईलवर गेम खेळायला चल असे बोलून त्याच्या घरात नेले. त्याठिकाणी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा खटला जळगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या.श्रीमती एस.एन.माने यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आला. यात सरकार पक्षातर्फे एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. यात पिडीत मुलगी, तिची आई, तपासी अंमलदार व वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वपुर्ण ठरली. न्यायालयाने भैय्या भरत गायकवाड याला दोषी ठरवून न्या.माने यांनी बाल लैंगिक अत्याचार कायद्यांन्वये १० वर्षाची सश्रम कारावास आणि ३५ हजार रूपयांचा एकत्रित दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड. केतन ढाके यांनी काम पाहिले तर पैरवी अधिकारी म्हणून हवालदार विजय पाटील यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज