fbpx

दिलासा ! खाद्य तेलाच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२१ । कोरोना काळात खाद्य तेलाच्या किंमती गगनाला भिडले आहे. सातत्याने होत असलेल्या भाव वाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. मात्र, तीन दिवसांपासून या भाववाढीला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. गेल्या तीन दिवसात शेंगदाणा आणि सोयाबीन तेलाच्या दरात घसरण दिसून आली आहे. शेंगदाणा तेलाचे भाव प्रतिकिलो 15, तर सोयाबीन तेल 12 रुपयांनी घसरले आहे. भाव कमी झाल्याने गृहिणींना काही अंशी का असेना पण दिलासा मिळाला. आठवडाभरात हे भाव आणखी कमी होऊ शकतात, असा अंदाज तेलाच्या व्यापार्‍यांकडून वर्तवण्यात आला आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव जसा वाढला तसे तेलाचे भावही सातत्याने वाढत होते. आता हळूहळू हे भाव नियंत्रणात येण्याचे संकेत बाजारपेठेतून मिळाले आहेत. तेलाचे भाव तीन दिवसांत 15 रुपयांनी घसरण्याचे मुख्य कारण हे कमोडिटी बाजारात झालेली घसरण व शासनाने तेलबिया आयात करण्याचा घेतलेला धोरणात्मक निर्णय हे असल्याचे मानले जाते आहे. 

कोरोनाची दुसरी लाट साधारणत: जानेवारी ते फुब्रुवारीच्या दरम्यान आली. त्या कालावधीत शेंगदाणा तेल 20 ते 25 तर सोयाबीन तेलाचे भाव 40 ते 50 रुपयांनी वाढले. भावात होणारी ही उड्डाणे पाहून अनेकांचे स्वयंपांक गृहाचे बजेट बिघडले होते. जे लोक 10 ते 15 किलोची पॅकिंग असलेले तेलाचे डबे घ्यायचे ते 2 ते 5 किलो तेल किराणा दुकानातून खरेदी करायचे. कधी नव्हे, इतके खाद्यतेल महाग झाल्याने अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. अर्थात, तेलाचे भाव कधी कमी होतात? याकडे सर्वसामान्यांच्या नजरा खिळल्या होत्या. आता भाव कमी झाल्याने हायसे वाटले आहे. परंतु, असे असले तरी सध्या जे दर आहेत ते आणखी कसे कमी होतील? याकडे किचन बजेट सांभाळणार्‍या गृहिणींचे लक्ष आहे.

शेंगदाणा तेलाचे दर गेल्या आठवड्यात 180 रुपये प्रती 900 ग्रॅम पाऊच असे होते. तर सोयाबीन तेलाचे दर 162 रुपये होते. ते सोमवारी घसरले. शेंगदाणा तेलाचे दर 15 रुपयांनी कमी होवून 165 झाले तर सोयाबीन तेलाचे दर 12 रुपयांनी कमी होऊन 148 रुपये झाले. शेंगदाणा तेल या महिन्यात 200 रुपयांचा टप्पा गाठते की काय? असे चित्र समोर आले होते. परंतु, आता भाव घसरल्याने गृहिणींच्या जीवात जीव आला. तेलाचा भडका उडाल्याने सामान्यांचे किचन बजेट कोलमडले होते. भाव कमी झाल्याने काही अंशी दिलासा मिळाला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज