शांतता समितीची बैठक : सोशल मीडियावरील अफवांना बळी पडू नका

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२१ । त्रिपुराच्या घटनेनंतर राज्यात अमरावती व मालेगावसह इतर ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी रविवारी तातडीने पोलीस मंगलम सभागृहात शांतता समितीची बैठक घेतली. त्यात व्हॅट्सऍप, फेसबुक, इन्टाग्राम यासह इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणी अफवा पसरवून दोन समुदायांत तेढ निर्माण करीत असेल तर त्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांना माहिती कळवावी,असे आवाहन बैठकीत केले.

यावेळी महापौर जयश्री महाजन, आमदार सुरेश भोळे, उपहापौर कुलभूषण पाटील, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा व्यासपीठावर उपस्थित होते. दरम्यान, त्रिपुरा व अमरावतीच्या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात तालुका पातळीवर शांतता समितीच्या बैठका घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जळगाव जिल्हा संवेदनशील असल्याने अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वधर्मीय सदस्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले. तसेच सायबर पोलिसांची सोशल मीडियावर करडी नजर राहणार आहे.

आमदारांनी पोलिसांविषयी व्यक्त केली नाराजी 

आमदार सुरेश भोळे यांनी पोलीस दलाविषयी नाराजी व्यक्त केली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. तेव्हाच शांतता समितीच्या सदस्यांची आठवण येते. इतर वेळी पोलीस ठाण्यात या सदस्यांना मान मिळत नाही. अवैध धंदे चालकाला खुर्ची मिळते अशी टीका करून भविष्यात या सदस्यांचा सन्मान व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी प्रत्येक सूचनेची दखल घेतली जाईल, असे आश्वासन दिले. महापौर जयश्री महाजन यांच्यासह शांतता समितीचे सदस्य अनिल अडकमोल, सय्यद अली नियाज अली यांनीही मनोगत व्यक्त केले.

बैठकीला शहरातील सर्व पोलीस स्टेशनचे निरीक्षक, शांतता समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज