माय-बाप झाले वैरी, निर्दयतेने घेतला मुलीचा जीव?

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२१ । शहरात मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली असून आई-बाप आणि मुलीच्या नात्याला हदरवणारा प्रकार समोर आला आहे. पिंप्राळा परिसरात भाड्याने राहत असलेल्या एका दाम्पत्याने मुलगी नको म्हणून आपल्याच १२ वर्षीय मुलीचा निर्दयतेने जीव घेतला आहे. मुलीच्या आजोबांना प्रकार कळल्यानंतर सर्व घटनाक्रम समोर आला आहे. मुलीला खाणे-पिणे न देणे, बांधून ठेवत खोलीत डांबून ठेवल्याने मुलीचा जीव गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

whatsapp image 2021 04 29 at 8.47.21 am

शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात भाड्याने राहणाऱ्या जावीद शेख हा वैद्यकीय वस्तू विक्री प्रतिनिधी म्हणून काम करतो. जावीद व त्यांची पत्नी नजिया परवीनबी यांना तीन मुली आहेत.

मुलीला समजत होता अपशकुनी

मोठी मुलगी कनीज जन्मली तेव्हा जावीद याच्या आईचा मृत्यू झाला. त्यानंतर २ वर्षात त्याचे मेडिकल जळाले. त्यामुळे ती मुलगी आपल्यासाठी दुर्भाग्य असल्याचे तो समजू लागला आणि तिचा छळ करू लागला. कनीजचे बाबा(आईचे वडील) यांना हा प्रकार समजल्याने ते तिला आपल्या घरी अमळनेर येथे घेऊन गेले. मुलगी ९ वर्षाची झाल्यावर जावीद याने काही मध्यस्थीच्या मदतीने तिला जळगावी घरी घेऊन आला.

मुलीचा मृत्यू आणि रातोरात दफनविधी

दि.२३ रोजी रात्री कनीजचा मृत्यू झाल्यानंतर कोणत्याही नातेवाईकांना न कळविता रातोरात तिचा दफनविधी करण्यात आला. जावीदने पिंप्राळा येथील कब्रस्थानमध्ये पावती देखील फाडली नाही. दुसऱ्याच दिवशी त्याने पत्नी आणि दोन मुलींसह जळगाव सोडून धुळे गाठले.

दोन दिवसांनी प्रकार उघड

मुलीच्या मामाला तीन दिवसांनी अमळनेर येथे एका बाहेरील व्यक्तीने येऊन सांगितले की, तुमच्या भाचीचा मृत्यू झाला आहे. मामाने हा प्रकार घरी कळवला असता मुलीच्या मोठ्या काकांकडून त्यांना याबाबत खात्री झाली. त्यामुळे त्यांनी जळगावातील इतर नातेवाईकांना घरी पाठवून खात्री केली असता जावीद घर बंद करून निघून गेला असल्याचे समजले.

मुलीचा छळ करीत घेतला जीव

लहानपणापासून नकोशी असलेल्या कनीज हिला घरातच एका खोलीत कोंडून ठेवले होते. अन्न, पाण्याविना तिचा जीव घेण्यासाठी तिला खायला, प्यायला देऊ नको असा दम जावीदने पत्नीला दिला होता. कनीजला खाण्यापिण्यासाठी न देता तिला बांधून ठेवलेले होते. गेल्या अनेक दिवसापासून हा प्रकार सुरू होता आणि त्यातच शरीर कमकुवत होऊन दि.२३ रोजी तिचा मृत्यू झाल्याची माहिती मुलीच्या आजोबांना समजली आहे. दरम्यान, पोलीस तपासात जावीद व नजिया यांनी देखील पोलिसांना योग्य उत्तरे दिली नाही. दोघांच्या उत्तरात तफावत आढळून आली.

व्हिसेरा राखीव, रामानंद नगर पोलिसात गुन्हा

दरम्यान, संपूर्ण घटनाक्रम विचित्र असल्याने रामानंद नगर पोलिसांनी मयतेच्या आई-वडिलांना बोलावून घेतले. दोघांची उत्तरे समर्पक न वाटल्याने कब्रस्थानमध्ये जाऊन तहसीलदार आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या उपस्थित मृतदेह बाहेर काढण्यात आला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून व्हिसेरा राखीव ठेवण्यात आला. त्यानंतर पुन्हा दफनविधी पार पडला. गेल्या तीन दिवसांपासून पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा हे याप्रकरणात लक्ष घालून होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बिरारी यांनी सरकारकडून फिर्याद दिली असून गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी जावीदला अटक केली असून रजियाला महिला निरीक्षणगृहात पाठविले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज