जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचखेडा येथे मध्यरात्रीच्या सुमारास गावातील गोठ्यात बांधलेल्या गुरांवर बिबट्याचा हल्ला करण्याचा प्रयत्न असताना दोन तरुणांनी वेळीच हाणुन पाडल्याची घटना २४ मार्च रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली. यामुळे गावकऱ्यांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे. जंगलाशिवाय शेती शिवारात शिकारीच्या शोदार्थ भटकणारा बिबट्या थेट मानवी वस्तीपर्यंत येऊन पोहचल्याने दहशत निर्माण झाली आहे.
तालुक्यातील कुऱ्हा-वडोदा रस्त्यावर असलेल्या चिंचखेडा खु या सह-सातशे लोकवस्तीच्या लहानशा गावातील गुरांच्या गोठ्याजवळील नाल्यावर येऊन हल्याच्या तयारीत असलेला बिबट्या तरुणांच्या प्रसंगावधानामुळे पळाला. रात्री दोनच्या सुमारास कुत्र्यांच्या जोरजोरात भुंकण्यामुळे गच्चीवर झोपलेला तरुण अनंता गजानन पाटील हा जागा झाला व डोळे चोळत कुत्रे इतके का भुकताहेत? हे जाणुन घेण्यासाठी बघताच समोर नाल्याच्या काठावर एक बिबट्या समोर गुरांवर नजर ठेवून असल्याचे त्याच्या निर्दशनास आले त्याने त्याचा मित्र नामदेव याला उठविले. या दोघं तरुणांनी आरडाओरडा केला तसेच कुत्र्यांच्या आवाजाच्या गलक्याने बिबट्याने धुम ठोकली. वेळीच जाग आल्याने गोठ्यातील पाळीव प्राणी वाचले. मात्र या घटनेमुळे तेथील ग्रामस्थ व पशुपालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन बंदोबस्त करण्याची मागणी पुढे येत आहे. हा बिबट पुन्हा येईल.! अशी भीती नागरीकांमध्ये आहे. या घटनेबाबत रहीवाशांमध्ये प्रचंड भीती असुन वनविभागाकडुन बंदोबस्त करण्याची मागणी रहीवाशांची आहे. याबाबत वनाधिकारी यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही. वनविभाग काय भुमिका घेतो याकडे लक्ष लागुन आहे. वनविभागाच्या भुमिकेबाबत कळु शकले नाही.