मनपाच्या जागेचा बेकायदा व्यावसायीक वापर करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑक्टोबर २०२१ । जळगाव शहरातील खुले भूखंड, व्यावसायीक गाळ्यांचा तसेच बेसमेंटच्या जागेचा अनधिकृत वापर करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करून नियमभंग करण्यात आलेल्या जागा महानगरपालिकेने ताब्यात घेण्याच्या सुचना उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिल्या.

जळगाव महानगरपालिकेच्या नगररचना विभागाची आढावा बैठक शुक्रवार दि.२२ रोजी उपमहापौर यांच्या दालनात पार पडली. बैठकीला सहाय्यक संचालक अशोक करवंदे, गटनेते दिपील पोकळे, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, किशोर बाविस्कर, चेतन सनकत यांच्यासह नगररचना, आस्थापना व अतिक्रमण विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत विकासकांकडून रो-हाऊसेस तसेच इतर सदानिकांचे बांधकाम करतांना नियमांची पायमल्ली केली जात असल्याने या विषयाकडे उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. मार्जिन स्पेसमध्ये करण्यात येणारी वाढीव बांधकामे तसेच गावठाण भागातील जुन्या नव्या इमारतीत काढण्यात आलेले व्यापारी गाळे यांचा सर्वे करुन संबधीत मालमत्ता धारकांना नोटीस देण्याच्या सुचनाही या बैठकीत देण्यात आल्या.

निधी डि.पी रस्त्यांसाठी खर्च करावा
विकास शुल्काअंतर्गत जमा होणारा निधी डि.पी. रस्त्यांसाठी खर्च करावा. शहरातील विस्तारीत भागातील डि.पी. रोड संदर्भात भुसंपादन अधिकारी यांना मोजणी व भुसंपादन मुल्याबाबत डि.ओ. पत्र देण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले. शहरातील विविध भुखंड शाळा आणि खाजगी संस्थांना देण्यात आलेले आहेत. शाळांना भुखंड देतांना टाकण्यात आलेल्या अटींचे पालन होत आहे की नाही याची तपासणी करण्यासह मंगल कार्यालये, व्यावसायिक गाळे याव्दारे व्यावसायिक उत्पन्न मिळवत असणाऱ्या व्यक्ती, संस्था यांच्या विरुध्द कायदेशीर तसेच आवश्यक तेथे फौजदारी कारवाई करण्यात यावी, बागवान फाउंडेशनला देण्यात येणाऱ्या जागेवर रुग्णालय उभारण्याच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यात यावा, पार्कीगच्या जागेचा व्यावसायीक वापर निष्काशित करण्याची कार्यवाही करण्यासाठी अतिक्रमण विभागाची मदत घेण्यात यावी, नगररचना विभागाला आवश्यक स्टाफ उपलब्ध करुन देणे अशा सुचना उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी बैठकीत दिल्या.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज