लोडशेडिंगचे संकट? ; दीपनगर मधील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात केवळ एक दिवसाचा कोळसा साठा शिल्लक

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२१ । मागील काही दिवसापासून राज्यात पाऊस कोसळत असून विदर्भातील चंद्रपूर विभागात असलेल्या कोळशाच्या खाणीत पाणी शिरल्याने याचा परिणाम कोळसा उत्पादनावर झाला आहे. भुसावळ येथील दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात 7 दिवसांचा कोळसा साठा शिल्लक असणे अपेक्षित असताना केवळ एक दिवसाचा कोळसा साठा शिल्लक आहे. कोळशाच्या टंचाईमुळे दीपनगर मधील तीन वीज निर्मिती संच बंद करण्यात आला आहे, अशी माहिती दिपनगर औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता विजय राठोड यांनी दिली आहे.

ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कोळशा निर्मितीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे कोळशाचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर दसरा आणि दिवाळी नागरिकांना अंधारात घालवावी लागेल अशी भीती वर्तवण्यात येत आहे. विदर्भातील कोळशाच्या खाणी मधून वीज निर्मिती केंद्रांना कोळसा पुरवला जातो. मात्र कोळशाच्या उत्पादनात घट झाल्याने राज्यातील औष्णिक वीज निर्मिती केंद्रांना अत्यंत कमी प्रमाणात कोळशाचा पुरवठा होत आहे.

भुसावळ येथील दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमध्ये 1लाख 12 हजार मेट्रिक टन असा 7 दिवसांचा कोळसा साठा अपेक्षित असताना केवळ एक दिवस पुरेल एवढा 16 हजार मेट्रिक टन कोळसा साठा शिल्लक आहे. कोळशाच्या टंचाईमुळे दीपनगर मधील तीन वीज निर्मिती संचापैकी 210 मेगावॅटचा संच बंद करण्यात आला आहे.

दरम्यान, दररोज गरजेनुसार कोळसा उपलब्ध होत असल्याने तूर्तास तरी वीज निर्मितीवर परिणाम झाला नसला तरी एक दिवसही कोळसा पुरवठा खंडित झाल्यास दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील निर्मिती ठप्प होण्याचा धोका वाढला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज