Exclusive : जिल्ह्यातील केवळ ८ गर्भवती महिलांनी घेतला लसीकरणाचा लाभ

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप । कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे असून आरोग्य मंत्रालयाने गर्भवती महिलांना लस देण्याचा नॅशनल टेक्निकल ऍडव्हायझरी ग्रुप ऑफ इम्यूनायजेशनच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. गर्भवती महिलांसाठी कोरोना लसीकरण सुरू झाले असले तरी जिल्ह्यातील केवळ ८ महिलांनी कोरोना लसीकरण करून घेतले आहे.

जळगाव जिल्ह्यात एकूण १९ हजार २४६ नोंदणीकृत गर्भवती महिला आहेत. ज्यातील केवळ ८ महिलांनी कोरोना लसीकरण करून घेतले आहे. त्यात जळगाव शहर २, एरंडोल तालुक्यातील २, मुक्ताईनगर तालुक्यातील १, यावल तालुक्यातील १, भडगाव तालुक्यातील १ व धरणगाव तालुक्यातील एका महिलेचा समावेश आहे. यामुळे लसीकरण करून घेण्यासाठी असलेला हा आकडा अतिशय कमी असून येत्या काळात मोठ्या प्रमाणावर लसीकरण होणे गरजेचे आहे.

बाळाला काही झाले तर?
कोणतीही स्त्री जेव्हा हे गर्भवती असते तेव्हा त्या स्त्रीला तिच्या पेक्षा आपले बाळ जास्त महत्त्वाचे असते. आपल्याला काहीही झाले तरी चालेल मात्र या लसीकरणाचा परिणाम आपल्या बाळावर होऊ नये असा विचार जिल्ह्यातील स्त्रिया करत आहेत. यामुळे जिल्ह्यातील स्त्रिया पुढे लसीकरण्यासाठी सरसावत नाही. असे जिल्ह्यातील काही तज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

लसीकरण करणे गरजेचे
जिल्ह्यातील अंगणवाडी संस्था व आशा वर्कर्स जिल्हाभर गरोदर महिलांना लसीकरण करण्यासाठी मार्गदर्शन व जनजागृती करत आहेत. कोणतीही महिला तपासणीसाठी जिल्ह्यातील चिकित्सकांकडे गेली तर त्या महिलांना लसीकरण करून घेणे आवश्यक आहे याबाबत डॉक्टर देखील मार्गदर्शन करत आहेत. यामुळे महिलांनी मोठ्या प्रमाणावर लसीकरण करणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागोजीराव चव्हाण यांनी जळगाव लाईव्हशी बोलताना दिली.

लसीकरणाने कोणताही त्रास नाही
लसीकरणाबाबत जिल्ह्यात अनेक अफवा आहेत. मात्र गर्भवती महिलांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता कोरोना लसीकरण करून घेणे अतिशय गरजेचे आहे. कारण या लसीकरणाने गर्भवती महिलेला किंवा त्यांच्या येणाऱ्या अपत्याला कोणताही धोका नाही हे सिद्ध झाले असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.

लसीचा गर्भावर परिणाम होत नाही
लसीकरणाबाबत समाजामध्ये अनेक बाबी बोलल्या जात आहे. मात्र अशा कोणत्याही बाबींवर विश्वास न ठेवता त्या गर्भवती मातांनी लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. कारण लसीचा कुठलाही थेट संबंध मातीच्या गर्भावर होत नाही हे सिद्ध झाले आहे असे डॉ.राधेश्याम चौधरी यांनी सांगितले.

लसीकरणाचा कोणताही त्रास नाही
विज्ञाननिष्ठ होऊन मी गर्भवती असतानाही लसीकरण करून घेतले. यासाठी मी डॉक्टरांचा सल्ला घेतला. आतापर्यंत मला कोणताही त्रास झालेला नाही, असे लसीकरण केलेल्या गर्भवती स्वाती कापसे यांनी सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -