एक दिवसाच्या चिमुरडीला कचराकुंडीत फेकले, अनोळखी मातेने प्रयत्न केले पण…

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२१ । ‘माता तू न वैरणी’ असे म्हटले जाते. जळगाव शहरात असाच एक प्रकार समोर आला आहे. शहरातील राजीव गांधी नगरात मंगळवारी सकाळी कचरा वेचण्यासाठी गेलेल्या एका महिलेला कचऱ्यातून बाळाच्या रडण्याचा आवाज आला. महिलेने त्यात शोध घेतला असता एक दिवसाची चिमुकली रडताना मिळून आली. ती महिला चिमुरडीला घेऊन शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात उपचारार्थ घेऊन आली पण तिचे प्रयत्न व्यर्थ ठरले. कडाक्याच्या थंडीत गारठलेल्या चिमुरडीची उपचार मिळण्यापूर्वीच प्राणज्योत मालावली. डोळ्यात अश्रू आणि हातात चिमुरडीचा मृतदेह घेऊन ती अनोळखी माता जिल्हा रुग्णालयाच्या बाहेर पडली.

जळगाव शहरातील राजीव गांधी नगरात मंगळवारी चंदाबाई कंडारे या नेहमीप्रमाणे सकाळी ८ वाजेच्या सुमारास कचरा वेचण्यासाठी गेल्या होत्या. कचरा वेचताना अचानक त्यांना कचराकुंडीजवळ बाळाच्या रडण्याचा आवाज आला. चंदाबाई यांनी जवळ जाऊन शोध घेतला असता त्यात एक नवजात चिमुकली मिळून आली. पती आणि मुलासह चंदाबाई त्या चिमुकलीला घेऊन जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पोहचल्या. उपचार सुरु होण्यापूर्वीच त्या चिमुकलीची प्राणज्योत मालावली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर मृत घोषित केले. रात्रभर आणि पहाटेच्या थंडीत गारठून त्या चिमुकलीचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला.

जन्मदात्या मातेने पोटच्या गोळ्याला फेकून दिले पण एका अनोळखी मातेने चिमुकलीला छातीशी लावून मायेची उब देत जिल्हा रुग्णालयात आणले. वेळेअभावी वेळीच उपचार न मिळाल्याने नवजात चिमुकलीचा मृत्यू झाला. चिमुकलीच्या मृत्यूने चंदाबाई यांचे डोळे पाणावले आन रडत रडतच त्या चिमुकलीचा मृतदेह घेऊन जिल्हा रुग्णालयाबाहेर पडल्या. दरम्यान, बाळाची नाळ देखील कापलेली नव्हती आणि ते बाळ स्त्री जातीचे होते. कदाचित मुलगी झाली म्हणून कुणीतरी तिला कचराकुंडीत फेकून दिले असावे असा अंदाज आहे. एका निष्पाप जीवाचा बळी घेण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या पालकांचा शोध घेऊन त्यांना शिक्षा होण्यासाठी पोलिसांनी स्वतः परिश्रम घेणे आवश्यक आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -