अमळनेरात आढळले दीड दिवसाचे अर्भक; प्रकृती गंभीर

जळगाव लाईव्ह न्यूज । १ नोव्हेंबर २०२१ । अमळनेर शहर बसस्थानकाच्या पाठीमागे दीड दिवसाच्या स्त्री जातीचे अर्भक आढळून आल्याची घटना रविवार दि.३१ रोजी घडली आहे. दरम्यान, या बाळाचे प्राण्यांनी लचके तोडल्याने त्याला गंभीर जखमा झाल्या असून त्याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

अमळनेर शहरातील बसस्थानक परिसरात नवजात स्त्री जातीचे अर्भक बेवारस स्थितीत असल्याची माहिती एका पोलिस कर्मचाऱ्याला रविवार दि.३१ रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास मिळाली होती. त्यानुसार त्या कर्मचाऱ्याने हि माहिती वरिष्ठांना कळवून या नवजात अर्भकाला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. जी.एम. पाटील व सहकाऱ्यांनी त्या अर्भकावर प्रथमोपचार करून त्याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर अमळनेरच्या पोलिस कर्मचारी सारिका जरे व सुनीता पाटील यांनी त्या बाळाला जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. याठिकाणी सीएमओ डॉ. स्वप्निल कळसकर, बालरोगतज्ज्ञ डॉ.हितेंद्र भोळे, नवजात शिशू अतिदक्षता विभागाच्या प्रमुख डॉ. शैलजा चव्हाण यांनी त्याच्यावर उपचार केले. दरम्यान, अवघ्या दीड दिवसाच्या या बाळाचे प्राण्यांनी लचके तोडल्याने त्याला गंभीर जखमा झाल्या असून बाळाची प्रकृती गंभीर आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज