मदतीचा बहाणा ; एटीएम कार्ड बदलून भामट्यांनी वृद्धाला घातला गंडा

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२१ । एटीएम पैसे काढण्यासाठी मदत करण्याचा बहाणा करत तीन भामट्यांनी एका वृद्धाचे एटीएम कार्ड बदलून २० हजार रुपये काढून घेत फसवणूक केल्याची घटना २३ रोजी शिव कॉलनी स्टॉपवरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रात घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की, टेन्नीराम रामू महाजन (वय ७०, रा. शिव कॉलनी) यांची फसवणूक झाली आहे. महाजन हे सेवानिवृृत्त आहेत. ते २३ रोजी एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेले होते. तांत्रिक अडचण येत असल्यामुळे पैसे निघत नव्हते. या वेळी तेथे तीन अनोळखी तरुण आले. त्यांनी महाजन यांना मदत करण्याचा बहाणा करून एटीएमचा पिनकोड विचारून घेतला. पैसे काढून देत असताना महाजन यांचे लक्ष विचलित करून त्यांचे एटीएम कार्ड अदलाबदली करून घेतले.

पैसे निघण्यास काही तरी अडचण येत असल्याचे सांगत त्यांनी महाजन यांना परत पाठवून दिले. त्यानंतर महाजन यांचे एटीएम कार्ड वापरून तीन वेळा करून २० हजार रुपये काढून घेतले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महाजन यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी तरुणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र पाटील तपास करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज