भरधाव वाळू डंपरने घेतला परिचारिकेचा जीव, तरसोदजवळील घटना

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२१ । जिल्हाभरात अवैध वाळू वाहतुकीमुळे होणारे अपघात नित्याचेच झाले आहे. मंगळवारी शिवकॉलनीजवळ वाळू ट्रॅक्टरमुळे झालेला अपघात ताजा असताना बुधवारी दुपारच्या सुमारास भरधाव वाळू डंपरच्या धडकेत एक महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. अपघात जळगाव – भुसावळ दरम्यान महामार्गावर तरसोद फाट्यानजीक घडला असून मयत महिलेचे नाव प्रेरणा देविदास तायडे वय-३२ रा.कंडारी, ता.भुसावळ असून ती जिल्हा सामान्य रुग्णालयात अधिपरिचारिका होती.

जळगाव शहरात कालच शिवकॉलनी नजीक एका भरधाव वेगातील वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने कारवाईपासून पळ काढण्याच्या प्रयत्नात एका रिक्षाचा चुराडा केला होता. या घटनेला काही तास उलटत नाही तोच वाळूमाफियांमुळे एका महिलेला जीव गमवावा लागला आहे. तरसोद फाट्याजवळ भरधाव वाळू डंपर क्रमांक एमएच.१९.वाय.७७७३ ने दुचाकीस्वार महिलेला जोरदार धडक दिली. घटनेची माहिती कळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे, सहाय्यक फौजदार अलीयार खान, कर्मचारी हसरत सैय्यद, महिला कर्मचारी लिना लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

अपघात इतका भयंकर होता कि दुचाकी डंपरच्या खाली दाबली जाऊन महिलेच्या शरीराचा चेंदामेंदा झाला आहे. मयत प्रेरणा तायडे या जिल्हा रुग्णालयात अधिपरिचारिका असून कामावरून सुट्टी झाल्याने त्या घरी जात होत्या. नशिराबाद पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला असून नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. मयताच्या नातेवाईकांनी घटनेची माहिती कळताच जिल्हा रुग्णालयात धाव घेत एकच आक्रोश केला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज