Breaking News ! राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढणार

मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२१ । राज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासह अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत कोरड्या राईड्ससाठी २२ ऑक्टोबरपासून परवानगी देण्याचा निर्णय आज टास्क फोर्सच्या बैठकीत घेण्यात आला. वेळा वाढविण्याबाबत मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

या बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर, मुंबई पालिका उपायुक्त सुरेश काकाणी, टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. खुसराव्ह, डॉ. अजित देसाई, डॉ. सुहास प्रभू आदी उपस्थित होते.

कोविडव्यतिरिक्त डेंग्यू, चिकनगुनिया यांच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ असून त्यांच्या उपचारांकडेदेखील पुरेसे लक्ष द्यावे अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आपण हळूहळू निर्बंध शिथिल करीत असून रुग्ण संख्या कमी होताना दिसते. 22 ऑक्टोबरपासून आपण चित्रपटगृहे, नाट्यगृहे यांनाही सुरू करीत आहोत. उपाहारगृहे व दुकाने यांचीदेखील वेळा वाढवून देण्याची सातत्याने मागणी होत आहे. त्यामुळे त्यांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

तसेच अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत कोरड्या राईड्ससाठी परवानगी देण्याचे ठरले. पार्क्समधील पाण्यातल्या राईड्सबाबतीत नंतर निर्णय घेण्याचे ठरले. अम्युझमेंट पार्कदेखील 22 ऑक्टोबर पासून सुरू होतील.

लहान मुलांच्या लसीकरणासाठी तयार राहण्याची सूचना
मुलांच्या लसीकरणासंदर्भात केंद्राच्या संपर्कात राहून लस उपलब्ध करून घेणे तसेच याबाबतीत निर्णय झाल्यावर लसीकरणाची तयारी ठेवण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागास केल्या.

मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळणे गरजेचे
दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे. नियमित मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळणे व हात स्वच्छ धूत राहणे खूप आवश्यक आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.तसेच याबाबतीत लोकांनी बेसावध राहू नये. यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी, असेही त्यांनी सूचित केले. कोरोनावरील उपचारांसाठी जगात नवनवीन प्रयोग होत असून येणाऱ्या नवीन औषधांच्या बाबतीतही त्यांची परिणामकारकता, किंमत, उपलब्धता याबाबत आत्तापासूनच माहिती घेत राहावी व संबंधितांच्या संपर्कात राहावे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज