fbpx

गल्लोगल्ली दिवसा सुऱ्या विकून प्लॅनिंग, रात्री कुख्यात दरोडेखोरांकडून डल्ला

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २ सप्टेंबर २०२१ । शहरातील मोहाडी रोड परिसरात असलेल्या दौलत नगरात फेब्रुवारीत सशस्त्र दरोडा टाकत १८ लाखांचा ऐवज लुटण्यात आला होता. एलसीबीच्या पथकाने सबळ पुरावा नसताना देखील चार संशयीत निष्पन्न केले असून दोघांना अटक केली आहे. जळगावात दिवसा गल्लोगल्ली फिरून चाकू, सुऱ्या विक्री करीत घरांची टेहाळणी करायची आणि त्याची माहिती बाहेरगावच्या कुख्यात दरोडेखोरांना पुरवायची अशी त्यांची पद्धत असल्याची माहिती एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

मोहाडी रोड परिसरात असलेल्या दौलत नगरात पिंटू बंडू इटकरे हे परिवारासह राहतात. दि.३ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास ५ दरोडेखोरांनी त्यांच्या घरात घुसून सशस्त्र दरोडा टाकला होता. दरोडेखोरांनी इटकरे यांच्या घरातून १८ लाख ५ हजारांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेकडून गुन्ह्याचा सतत पाठपुरावा सुरू होता. सबळ पुरावा नसताना देखील गुन्हा उघडकीस आणण्यास पथकाला यश आले आहे.

चौघांची नावे निश्चित, दोघांना अटक

स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रवी नरवाडे, संदीप पाटील, संतोष मायकल, रणजित जाधव, श्रीकृष्ण देशमुख, परेश महाजन, मुरलीधर बारी यांना जालना येथे रवाना केले होते. तसेच हवालदार संजय हिवरकर, राजेश मेंढे, सुनील दामोदरे, जयंत चौधरी, महेश महाजन, किरण चौधरी, प्रवीण मांडोळे, दीपक चौधरी यांचे पथक जळगावात तपासाकामी रवाना केले होते. पथकाने करणसिंग रा.परभणी, तेजासिंग नरसिंग बावरी, ज्वालासिंग रामसिंग कलाणी दोघे रा.जालना आणि रणजितसिंग जिवनसिंग जुन्नी रा.राजीवगांधी नगर, किशोरसिंग उर्फ टकल्या रामसिंग टाक रा.जालना अशी नावे निष्पन्न झाली होती. पथकाने किशोरसिंग उर्फ टकल्या रामसिंग टाक याला सापळा रचून जालना येथून तर रणजितसिंग जिवनसिंग जुन्नी याला जळगावातून अटक करण्यात आली होती.

जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्याची चौकशी

पोलिसांकडून फिर्यादीच्या घराची नेमकी माहिती कोणी दिली याचा तपास करणे सुरू आहे. जळगाव जिल्हा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याला देखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेला रणजितसिंग हा जळगावात गल्लोगल्ली गावात फिरून दिवसा चाकू, सूरी विकून घरांची रेकी करत होता. घरांची टेहाळणी केल्यावर इतर जिल्ह्यातील गुन्हेगारांशी संपर्क करून ते प्लॅनिंग करीत होते आणि त्यानंतर दरोडा टाकत असल्याची माहिती निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी दिली आहे. दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता ५ दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज