गाैणखनिजाच्या बाेगस पावत्यांप्रकरणी ठेकेदारांना पैसे भरण्याच्या नाेटीस

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२१ । जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागात गाैणखनिजाच्या बाेगस पावत्या जाेडून शासनाला लाखाे रुपयांचा चुना लावणाऱ्या कंत्राटदार,अभियंत्यांवर कारवाई केली जात आहे. तत्पूर्वी सर्वांना नाेटीस बजावून अपहाराची रक्कम शासनाच्या तिजाेरीत भरण्याची नाेटीस काढली आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. पंकज आशिया यांनी कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बहुतांश कंत्राटदारांनी तातडीने रक्कम भरण्याची तयारी दर्शवली आहे.

जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागात तब्बल १ काेटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या बाेगस गाैणखनिजाच्या पावत्या जाेडून शासनाचा निधी लाटण्यात आला आहे. शासनाला गाैणखनिज राॅयल्टीचे पैसे भरण्याएवजी बाेगस पावत्या जाेडल्याने शासनाचे आर्थिक नुकसान झाले आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील गाैणखनिज विभागाच्या बाेगस पावत्यांचा वापर करण्यात आला हाेता.

कंत्राटदारांना वाचवण्यासाठी लाेकप्रतिनिधींची धडपड

जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांच्या पाठपुराव्याने गाैणखनिजाची रक्कम हडप करणारे अभियंते आणि कंत्राटदाराचे रॅकेट समाेर आले आहे. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, काही जिल्हा परिषद सदस्य शासनाची फसवणूक करणाऱ्या कंत्राटदारांचा बचाव करण्यासाठी पुढे आले आहेत. ही कारवाई टाळावी म्हणून प्रशासनावर दबाव आणला जात असल्याची स्थिती आहे.

मास्टरमाइंड अभियंत्याचा शाेध

जिल्हा परिषदेतील कंत्राटदारांना गाैणखनिजाच्या बाेगस पावत्या पुरवणाऱ्या एका अभियंत्याने जिल्हाधिकाऱ्यांचे खाेटे पत्र तयार केले हाेते. या प्रकरणात दाेषी असलेल्या अन्य अभियंत्यांसह एका मास्टरमाइंड अभियंत्याचा समावेश आहे. त्यानेच सर्व बाेगस पावत्या छापून त्या कंत्राटदारांना घेण्याची सक्ती केली हाेती. या अभियंत्याचा शाेध सध्या सुरू आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज