‘नो हॉकर्स झोन’ची अंमलबजावणी करण्यात यावी; गाळेधारकांची निवेदनाद्वारे मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ नोव्हेंबर २०२१ । जळगाव महानगरपालिकेत २०१४ मध्ये महासभेत ठराव मंजूर करून सेंट्रल फुले मार्केट व फुले मार्केटला ‘नो हॉकर्स झोन’ घोषित करण्यात आले आहे, मात्र त्यावर महापालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने फुले मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे फुले मार्केटमध्ये ‘नो हॉकर्स झोन’ची अंमलबजावणी करून अतिक्रमण मुक्त करण्यात यावे, अशी मागणी महात्मा फुले मार्केटमधील गाळेधारकांकडून महापालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात, २०१४ मध्ये तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांनी महासभेत ठराव मंजूर सेंट्रल फुले मार्केट व फुले मार्केटला ‘नो हॉकर्स झोन’ म्हणून घोषित केले आहे. मात्र, या ठरावाची कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही. दुकानाची साईज ही फक्त १२० चौरस फूटाची आहे, याउलट अतिक्रमणधारकाचा स्टॉल हा जवळपास ३०० ते ४०० चौरस फूटापर्यंत असतो. अतिक्रमणधारक हे कोणत्याही जागेची शाहनिशा न करता पार्कीगच्या जागेवर सुद्धा आपले स्टॉल उभे करतात. त्यांना हटकण्याचा प्रयत्न करण्यात आला तर गुंडगिरी करून लोकजमाव करून दुकानदार तसेच नागरिकांवर दबाव आणला जातो. यामुळे काही एक अप्रिय घटना घडल्यास त्यास शासन जबाबदार राहील, असे नमूद करण्यात आले आहे.

व्यापारी संकुलातील दुकानदार आपणास करोडो रूपयाचे भाडे भरतो. परंतु त्यांना पार्कीगसाठी जागा, दिवाबत्ती, स्वच्छतागृह, साफसफाई अशा कोणत्याही प्रकारची सुविधा मिळत नाही. याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. फुले मार्केट हे जळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने या ठिकाणी शहर व जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्र भरातून नागरिक खरेदीसाठी येत असतात. यात स्त्री-वर्ग मोठ्या प्रमाणात येत असतो. चोरी, छेडछाडीच्या घटना या ठिकाणी नेहमी घडत असतात. गाडीला ब्रेक लागला त्याच ठिकाणी गाडी पार्क होत असल्याने सर्व गाड्या रस्त्यात लागतात. त्यामुळे मार्केटमध्ये येणारे सर्व रस्ते ब्लॉक होवून जातात. त्यामुळे २०१४ मध्ये घोषित झालेल्या ‘नो हॉकर्स झोन’ ची अंमलबजावणी त्वरीत करण्यात यावी व मार्केट अतिक्रमण मुक्त करावे, अशी मागणीही गाळेधारकांकडून करण्यात आली आहे. निवेदनावर, दोनशेवर गाळेधारकांच्या सह्या आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज