fbpx

नितीन लढ्ढांचे संपर्क कार्यालय, आमदारकीचे सूतोवाच!

mi-advt

नितीन लढ्ढांचे संपर्क कार्यालय, आमदारकीचे सूतोवाच!

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२१ । शहरातील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांचे संपर्क कार्यालय जळगाव शहरातील मध्यवर्ती भागात तयार करण्यात आले असून आषाढी एकादशीचे औचित्य साधत कार्यालयाचे भव्य उद्घाटन केले जाणार आहे. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे कट्टर समर्थक असलेल्या मणियार बंधुनी लढ्ढा यांचे संपर्क कार्यालय सुरू केल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे.

शहरात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून अनेकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. जळगाव शहरात सध्या माजी मंत्री गिरीश महाजन, विद्यमान आमदार सुरेश भोळे यांचे संपर्क कार्यालय असून इतर लोकप्रतिनिधी मात्र कुठे फिरकत नसल्याचे दिसून येते. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून आमदारकी लढविण्याचे स्वप्न अनेक जण पाहत असले तरी अद्यापही कुणीही खुलेपणाने मैदानात उतरले नाही. शिवसेनेकडून सध्या काही नावे पुढे येत असली तरी त्यात युती आणि आघाडीच्या भविष्यातील निर्णयावर सर्वांचेच भवितव्य अवलंबून आहे.

जळगाव शहरातील मध्यवर्ती परिसर असलेल्या गोविंदा रिक्षा स्टॉप जवळ शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांचे संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. संपर्क कार्यालयाचे अद्याप अधिकृतपणे उद्घाटन झाले नसले तरी आषाढी एकादशीचे औचित्य साधत सर्व नगरसेवक, आमदारांच्या उपस्थितीत उद्घाटन केले जाणार असल्याचे माहिती आहे. २०२४ ची विधानसभा निवडणुका लक्षात घेता या कार्यालयाचे उद्घाटन हे पुढील राजकीय सूतोवाच असल्याचे बोलले जात आहे.

नगरसेवक नितीन लढ्ढा यांची काही दिवसांपूर्वी जळगाव लाईव्हने मुलाखत घेतली असता आमदारकी लढविण्याबाबत उत्तर देताना त्यांनी अतिशय समर्पकपणे मत मांडत जनतेची आणि शहराची सेवा करणे हाच उद्देश असल्याचे सांगितले होते. त्यातही पद कोणतेही असो फक्त सेवा हाच आपला धर्म असल्याचे त्यांनी मांडले होते.

नितीन लढ्ढा शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक असून माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे खंदे समर्थक आणि विश्वासू निकटवर्ती आहेत. सुरेशदादा जैन यांच्यानंतर त्यांचा पुढील राजकीय वारसदार म्हणून नितीन लढ्ढा यांच्याकडे पाहिले जाते. शहराच्या मध्यवर्ती भागात सुरू करण्यात आलेल्या या कार्यालयातून ७, शिवाजीनगरची पुढील सर्व सूत्रे हलतील असा अंदाज राजकीय विश्लेषक बांधत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज