सुनील शेट्टीसोबत दोनगावची ‘निर्भया’ धारावी बँकमध्ये झळकणार!

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २० डिसेंबर २०२१ । धरणगाव तालुक्यातील दोनगाव या छोट्याशा गावातील मूळ रहिवासी व मुंबई पोलीस असलेल्या लीलाधर पाटील यांची कन्या ‘निर्भया’ची धारावी बँक (Dharavi Bank) या वेबसिरीजसाठी निवड झाली आहे. सुनील शेट्टी (Sunil Shetty), विवेक ओबेरॉय, सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) सारखे दिग्गज स्टारकास्ट असलेल्या या वेबसिरीजचे दिग्दर्शन सुमीत कक्कड यांनी केले आहे. ‘निर्भया’च्या निवडीने जळगावचे नाव पुन्हा एकदा उंचावले आहे.

धरणगाव तालुक्यातील दोनगाव या छोट्याशा गावातील मूळ रहिवासी व मुंबई पोलीस असलेल्या लीलाधर पाटील यांनी सेवा बजावत असतानाच अभिनयाची आवड जोपासली. ते पाहून त्यांची मुलगी निर्भयानेदेखील ही कला आत्मसात केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कला अनेकांपर्यंत पोहाेचवणाऱ्या निर्भयाची ‘धारावी बँक’ या वेब सिरीजसाठी निवड झाली अाहे. दिग्गज अभिनेत्यांसोबत काम करण्याची संधी तिला मिळाली.

दोनगाव या छोट्याशा खेड्यातून लीलाधर पाटील या तरुणाने आपल्या जीवनाचा प्रवास सुरू केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली आणि फौजदार म्हणून त्यांची निवड झाली. मुंबई पोलिसात सेवा बजावत असताना त्यांना अभिनयाबद्दल रुची निर्माण झाली आणि वरिष्ठांच्या परवानगीसह त्यांनी अभिनय क्षेत्रात काम सुरू केले. वडिलांना टीव्हीवर बघून त्यांची अकरा वर्षाची मुलगी निर्भयालासुद्धा वडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्रात रस निर्माण झाला. टिकटॉक, इन्स्टाग्राम यासारख्या सोशल व्यासपीठांवर निर्भया लहान-मोठी अभिनयाची चुणूक दाखवत होती आणि आता नुकतीच निर्भयाची सुनील शेट्टी, विवेक ओबेरॉय, सोनाली कुलकर्णी या दिग्गज अभिनेत्यांसोबत सुमीत कक्कड दिग्दर्शित धारावी बँक या वेब सिरीजमध्ये अभिनयासाठी निवड झाली आहे.

निर्भया या वेब सिरीजमध्ये सुनील शेट्टी यांच्या नातीची भूमिका साकारणार आहे. लीलाधर पाटील यांचे आई-वडील दोनगाव येथे शेती करतात. अतिशय सामान्य कुटुंब व्यवस्थेतून लीलाधर पाटील आणि निर्भया यांनी चंदेरी दुनियेत खान्देशातून पाय ठेवायला सुरुवात केलेली आहे. निर्भया आणि लीलाधर पाटील यांच्या या बॉलीवूडमधील पदार्पणामुळे खान्देशची मान उंचावली आहे.

वडिलांसह मुलीचे बॉलीवूडमध्ये पदार्पण
वेब सिरीजसाठी निर्भयाला तमिळ भाषेत ऑडिशन द्यायचे होते. एका सामान्य मराठी कुटुंबातील मुलीने यासाठी तमिळ भाषा अभ्यासायला सुरुवात केली. तिची आई वैशाली पाटील यांनी तिच्याकडून मेहनत करून घेतली आणि पहिल्याच ऑडिशनमध्ये सुनील शेट्टी यांच्या कौतुकाला पात्र ठरत निर्भयाची निवड झाली. निर्भयाचे वडील लीलाधर पाटील यांनाही क्राइम पेट्रोल, ठिपक्यांची रांगोळी, तेरा यार हू मै या मालिकांसह दोन वेब सिरीजमध्ये पोलिस इन्स्पेक्टरची भूमिका मिळालेली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -