क्रेडिट कार्ड बंद करण्याच्या बहाण्याने एकाला ९० हजाराचा लावला चुना, गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ नोव्हेंबर २०२१ । क्रेडिट कार्ड बंद करण्याच्या बहाण्याने एका कामगाराची ९० हजारांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना तब्बल एका महिन्यानंतर उघड झाली आहे. अनिल कुमार इंद्रदत्त त्रिपाठी( वय ५२ रा. एमआयडीसी, जळगाव)असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव असून याप्रकरणीएमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

याबाबत असे की, अनिल त्रिपाठी हे एमआयडीसीतील खान्देश फ्लोअर मिलमध्ये खासगी नोकरी करतात. याचठिकाणी कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ३० ऑक्टोंबर रोजी ते खान्देश मिल येथे कंपनीत कामावर जात असतांना , त्यांना ९३७१७७७५५४ या क्रमांकावरुन अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्याने त्रिपाठी यांना त्यांनी क्रेडीट कार्डच्या आधारावर केलेल सर्व व्यवहाराचे तपशील सांगत त्रिपाठी यांचा विश्‍वास संपादन केला. अतिरिक्त चार्ज लागत असल्याने त्रिपाठी यांनी संबंधितांना मला क्रेडीट कार्ड नकोय ते बंद करा असे सांगितले. क्रेडिट कार्ड बंद करण्याच्या बहाण्याने संबंधितांनी त्रिपाठी यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी विचारला. ओटीप सांगताच त्रिपाठी यांच्या बँकेच्या खात्यातून ९० हजार ७८० संबंधितांनी काढून घेतले.

त्यानंतर संबंधित फोनवर बोलणार्‍या व्यक्तीने त्रिपाठी यांना थॅक्यू म्हणून फोन कट केला. तसेच पुढील दोन दिवसात कुणाचेही फोन उचलू नका अन्यथा क्रेडीट कार्ड पुन्हा सुरु होईल अशी बतावणी केली. ३ नोव्हेंबर रोजी त्रिपाठी त्यांचे खाते असलेल्या स्टेट बँकेत गेले असता त्यांना त्यांच्या खात्यावरुन ९० हजार ७८० रुपये काढून घेतल्याचे दिसून आले. ३० ऑक्टोंबर रोजी क्रेडीट कार्ड बंद करण्याच्या बहाण्याने फोनवर बोलणार्‍या अनोळखी व्यक्तीने आपली फसवणूक केल्याची खात्री झाल्यावर त्रिपाठी यांनी गुरुवारी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक रविंद्र गिरासे करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज