आठवड्यात नऊ कोटींचे नुकसान!

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२१ । एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ७ नोव्हेंबरपासून काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. आठवडाभरातही कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासनाकडून कुठलाही तोडगा निघाला नाही. त्यामुळे महामंडळाच्या जळगाव विभागाचे आतापर्यंत सुमारे आठ कोटींचे प्रवासी उत्पन्न बुडाले असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांनी दिली.

दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या वेतनासाठी एसटीच्या कामगार संघटनांनी आंदोलन पुकारले होते. सरकारने यामध्ये काही मागण्या मान्य केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर आता कर्मचाऱ्यांनी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी कुठल्याही कामगार संघटनेचा पाठिंबा न घेता, स्वत:हून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे महामंडळाची बससेवा पूर्णपणे ठप्प असून, प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. आठवडाभरापासून सुरू असलेल्या या काम बंद आंदोलनामुळे आधीच तोट्यात असलेले महामंडळ आता अधिकच तोट्यात जात आहे. अधिकाऱ्यांनी चर्चा करूनही कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असून, आता या आंदोलनात त्यांचे कुटुंबीयदेखील सहभागी झाल्यामुळे हे आंदोलन वेगळ्याच वळणावर येऊन ठेपले आहे.

आगारांमध्ये २४ तास पोलीस बंदोबस्त एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर आगारांमध्ये कुठलाही गैरप्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनातर्फे जळगाव आगारात २४ तास पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच संपातील कर्मचाऱ्यांना शांततेच्या मार्गाने संप करण्याच्या सूचना केल्या आहेत. विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनीदेखील पोलीस अधीक्षकांना पत्र देत जिल्हाभरातील आगारांमध्ये पोलीस बंदोबस्त पुरविण्याची मागणी केली आहे.

आतापर्यंत १३७ कर्मचाऱ्यांचे निलंबन

न्यायालयाच्या आदेशानुसार कर्मचारी कामावर रुजू होत नसल्याने महामंडळाने या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरू केली आहे. यामध्ये काही कर्मचाऱ्यांना आंदोलनास प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत निलंबित करण्यात येत आहे. तर काहींना न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचा ठपका ठेवत निलंबित करण्यात येत आहे. विभागात आतापर्यंत १३७ कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज